मुंबई : मार्च महिन्याचा आज पहिला दिवस आहे.
आणि उन्हाळ्याची चाहूल लागयला सुरूवात झालीय. राज्यात पुढचे 36 तास उष्णतेची लाट कायम असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. शिवाय मे महिन्यात मराठावाडा आणि विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद होण्याची शक्यता दिल्लीतल्या राष्ट्रीय हवामान विभागानं वर्तवलीय. यंदा उन्हाळात देशभरातला कडाका वाढणार असून मे महिन्यात सरासरीपेक्षा तापमान दीड अंशांनी वाढणार आहे.
येणाऱ्या कालावधीत उन्हाचा तडाखा चांगलाच बसणार असल्याचे संकेत निसर्गाने दिले आहेत. येत्या ४८ तासांमध्ये रायगड, ठाणे, ग्रेटर मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा अहवाल वजा इशारा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे वातावरण आणखीनच तापले आहे.
भारतीय हवामान खात्याने २८ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अहवालामध्ये हवामानात बदल होऊन तापमानात कमालीची वाढ होऊन येत्या ४८ तासांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अहवाल वजा इशारा जिल्ह्यातील प्रमुख विभाग, विविध कंपन्या यांना दिला. त्या अहवालाची प्रत दुपारनंतर सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत होती.
गेल्या २४ तासांतील तापमानाची नोंद घेतली असता ती तब्बल ४२ अंश सेल्सियस एवढी आढळली आहे. त्यामुळे आगामी कालावधीत उन्हाचा तडाखा हा चांगलाच बसणार असल्याचे संकेत आधीच दिले आहेत. गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाेच्च ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती, अशी माहिती पाठक यांनी दिली. आगामी कालावधीत गरमी वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.