Bail Pola : बैलपोळ्याला कशी घ्याल बैलांची काळजी ? शिंग रंगवताय, थांबा आधी 'हे' वाचा

Bail Pola : बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात "बैलपोळा" (Bail Pola) सण साजरा केला जातो.

Updated: Aug 26, 2022, 09:52 AM IST
Bail Pola : बैलपोळ्याला कशी घ्याल बैलांची काळजी ? शिंग रंगवताय, थांबा आधी 'हे' वाचा title=

मुंबई :  आपल्या देशाची ओळख ही कृषी प्रधान देश असल्याने शेतीचं आपल्या आयुष्यात खुप महत्व आहे. शेती क्षेत्रात कितीही तंत्रज्ञान आलं असलं तरी बैलाचं महत्व काही केल्या कमी होऊ शकत नाही. बैलाचं आणि शेतकऱ्यांच नातं हे जगातल्या सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे. शेतकरी, आपल्या कुटुंबीयांप्रमाणेच बैलावर प्रेम करत असतो. बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात "बैलपोळा" (Bail Pola) सण साजरा केला जातो.

बैल पोळ्याचा सण हा शेतकऱ्यांसाठी दिवाळीहून कमी नसतो. बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवताना अनेकदा त्यांच्या आरोग्यावर विपरित होतात. पोळ्याची परंपरा जपताना बैलांची नेमकी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल जाणून घेऊया...

अशी घ्या बैलाच्या अंघोळीची काळजी...

अनेकदा असं आढळून आलं की, बैलााल अंघोळ घालताना नद्या, नाले, ओढ्यांच्या पाण्याचा वापर केला जातो. अशा दुषित पाण्यामध्ये जिवाणू आणि विषाणू असल्यामुळे त्याचा परिणाम बैलांच्या शरिरावर होतो. अंघोळ करताना बैल फक्त अंघोळच करत नसतात तर ते पाणी पितातही.

बैलांना पाण्यात धुतल्यानंतर त्यांच्या शरीरावरील गोचीड, उवा, लिखा आणि त्यांची अंडी या पाण्यात मिसळून जातात, निरोगी बैलांना त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे बैलांचं आरोग्य धोक्यात येतं. म्हणून, बैलाला अंघोळ घालताना स्वच्छ पाण्याचा वापर करायला हवा. बैल जर सार्वजनिक पाणीसाठ्याच्या संपर्कात आले असतील तर पशुवैद्याच्या सल्ल्याने बाह्यपरोपजीवीनाशक औषध शरीरावर फवारावं आणि बैलाला जंतनाशक पाजावं.

शिंगाची रंगरंगोटी करताना अशी घ्या काळजी?

बैलाच्या शिंगाला रंग लावताना कायम लक्षात घ्यायला हवं की, शिंग साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू निर्जंतुक असायला पाहिजे नाहीतर जखम होऊन शिंगाच्या कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. शिंगाच्या कर्करोगावर शिंग समूळ कापण्याची वेळ पशुवैद्यावर येते .

शिंग साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू गंजलेली असेल तर धनुर्वात होण्याची शक्यता असते. शिंग रंगवण्यासाठी ऑइल पेंट्सचा वापर केला जातो. या पेंटमध्ये त्वचेसाठी घातक असणारी रसायने असतात. यावर उपाय म्हणजे शिंग साळणे शक्यतो टाळावं आणि शिंग रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करावा. साळताना जखम झाली तर पशुवैद्याच्या सल्ल्याने धनुर्वात रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.

पिठाचे गोळे आणि पोळ्या चारताना 'ही' घ्या काळजी

बैल पोळ्याच्या दिवशी आणि त्यापुर्वी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे आणि नैवेद्य म्हणून पूरणपोळ्या,कडधान्याचा भरडा चारला जातो. याचं प्रमाण जास्त झालं तर चारल्या जाणाऱ्या ऐवजामुळे बैलाला पोटाच्या समस्या निर्माण होतात. कधी कधी तर रक्तातील लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण वाढल्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. पोटाच्या समस्यामुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारतात, दात खाताता, जीभ चावतात, चारही पाय वर करून उजव्या बाजूस लोळतात. अशी लक्षणं दिसून आली की तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घेणं आवश्यक असतं.