लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांना धक्का बसला असून दिग्गजांचा धुराळा उडाला आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. कर्जत - जामखेड मतदारसंघात (karjat jamkhed Gram Panchayat Election Result) आमदार रोहित पवार यांना झटका लागला आहे. भाजपाचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांचं वर्चस्व कायम असल्याचं देखील समोर आलं आहे. निकालानंतरही रोहित पवार यांचा पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
आमदार रोहित पवार यांना राम शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आमदार रोहित पवारांचे समर्थक प्रशांत शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवलेल्या जवळा ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सदस्यांनी आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय. या ग्रामपंचातीवर आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे हे दोघेही अप्रत्यक्षपणे दावा करत होते. अखेर सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी जाऊन भाजपामध्ये सहभागी झाल्याचं जाहीर केलं आहे. ग्रामपंचायत सोबतच रोहित पवार यांचे खंदे समर्थक असलेले प्रशांत शिंदे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने आमदार रोहित पवारांना हा मोठा धक्का मनाला जात आहे.
"राजकारणात प्रवेश केल्यापासून राम शिंदे यांचा कार्यकर्ता आहे. ते लोकप्रतिनिधी, सरपंच, सभापतींना कामात मोकळीक देतात. त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. पण गेल्या अडीच वर्षात मला इथे आलेला अनुभव अतिशय अपेक्षाभंग करणारा आहे. त्यामुळे मी विचार केला. आता ग्रामपंचायत निवडणुकीत कोणतेही लेबल न लावता निवडणूक लढलो. पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरुन जनतेच्या आशिर्वादाने निवडणूक जिंकली. पण गावाचा विकास करायचा असेल तर आम्हाला राम शिंदे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. यामुळे आम्ही सर्वांनी विचार केला आणि इथून पुढच्या काळामध्ये राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ठरवलं आहे," अशी प्रतिक्रिया प्रशांत शिंदे यांनी दिली.