मयूर निकम, झी मीडिया, बुलडाणा : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारी संतनगरी शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही आषाढी एकादशीच्या वारीसाठी पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. पालखी दिनांक ८ जून रोजी सकाळी ७ वाजेला वारकरी, भजनी दिंड्या, गज आणि अश्वांसह प्रस्थान ठेवणार आहे. गेल्या ५२ वर्षांपासून "श्रीं" च्या पालखीची पंढरपूर येथे जाण्याची परंपरा आहे. सन १९६८ ला सुरु झालेल्या पालखीमध्ये अजूनही तसाच उत्साह कायम आहे. यामध्ये सर्वच वयोगटातील भक्तमंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात.
श्रींच्या पालखीला शेगाव शहरातील श्रींचे प्रगटस्थळ, देशमुख यांच्या मळ्यामध्ये वारकरी मंडळींना फराळ आणि चहा देण्यात येतो आणि त्यानंतर नागझरी या गावात ही पालखी जाते आणि तेथून हजारोंच्या संख्येने भक्तगण आपल्या "शेगावीच्या राणा" ला प्रेमाने निरोप देतात.
गजानन महाराजांच्या पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था केलेली असते. तसेच पालखी मार्गात जितकी गावं शहर येतात त्या प्रत्येक ठिकाणी या पालखीचे श्रीफळ वाहून स्वागत केले जाते. पालखीसोबत वारकरी आणि भक्तगणांच्या सुरक्षेकरिता पोलिसांसोबत रुग्णवाहिका तसेच मुबलक औषधसाठा वैद्यकीय अधिकारी सुद्धा असतात.
८ जून रोजी पंढरपूर कडे आषाढी एकादशी करिता प्रस्थान होत असलेल्या श्रींच्या पालखीचा जाण्याचा आणि येण्याचा मार्ग हा पुढीलप्रमाणे आहे . जातांना शेगाव - नागझरी - गायगाव - भौरद - अकोला - भरतपूर - वाडेगाव - देऊळगाव - पातुर - मेडशी - श्री क्षेत्र डव्हा - मालेगाव - शिरपूर जैन - चिंचाबा पेन - म्हसला पेन - किनखेडा - रिसोड- पान कान्हेरगाव - सेनगाव - परभणी - गंगाखेड - परळी - अंबाजोगाई - उस्मानाबाद - तुळजापूर - सोलापूर - मंगळवेढा मार्गे एकूण ७२५ किलोमीटर चा प्रवास करत १० जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे ही पालखी पोहोचते.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे संत गजानन महाराज यांची पालखी जवळपास ५ दिवस मुक्कामी असते, आणि मुक्काम झाल्यानंतर करकंब, कुर्डूवाडी, भगवान बार्शी, पाली, बीड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर. जानेफळ, शिरला नेमाने, आवार आणि खामगाव मार्गे पालखी ६ ऑगस्ट रोजी ५५० किलोमीटरचा प्रवास करत संतनगरी शेगाव येथे परत येणार आहे.
इतक्या वर्षांपासून सुरु असलेल्या या पालखीमध्ये आजवर लाखोंच्या संख्येने वारकरी तसेच भक्तगणांनी सहभाग नोंदवला आहे. एकूण १२७५ किलोमीटर हा प्रवास असतो परंतु आजपर्यंत या पालखीमध्ये कधीच कुणीही आपली शिस्त मोडली नाही.
ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम असतो त्या त्या ठिकाणी कुणीही अस्वच्छता पसरवत नाही. स्वच्छ , नीटनेटकेपणाने सर्वजण या पालखीमध्ये गण गण गणात बोतेच्या गजरात आपला भक्तीभाव सादर करत असतो.