पुणे - सातारा महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू तर 23 जण जखमी

Pune Satara Highway : पुणे - सातारा महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातानंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातात चार ते पाच वाहने एकमेकांना धडकल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले आहे. मात्र यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 11, 2023, 11:55 AM IST
पुणे - सातारा महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू तर 23 जण जखमी   title=

निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : पुणे - सातारा महामार्गावर (Pune Satara highway) वरवे गावाच्या हद्दीत विचित्र अपघात झालाय. चार वाहने एकमेकांना धडकल्यानं हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 2 कंटेनर आणि 2 बसचा या अपघातामध्ये समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की एक खासगी बस उलटली आहे. तर अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. तर 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर आली आहे.

या अपघातामध्ये खासगी बस पलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. गंभीर बाब म्हणजे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही वाहने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. अपघातात एसटीच्या शिवनेरी बसचेही मोठं नुकसान झालं आहे.

कसा झाला अपघात?

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला एका बसने मागून जोराची धडक दिली. या धडकेत बस उलटली. बस उलटल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी आहेत. याचवेळी एक कार देखील कंटेनरला मागून धडकली. मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सातारा रस्त्यावर या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू आहे. हा अपघात एसटीच्या भोर आगाराच्या हद्दीमध्ये घडला असून आगारातील एसटीचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

दादरमध्ये कार अपघातात दोघांचा मृत्यू

शुक्रवारी दादर पश्चिम येथे एका भरधाव कारने झाडाला धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी चालकाविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही जण लोअर परळ येथील एका पबमध्ये गेले होते आणि पार्टीनंतर कारने घरी निघाले होते. त्याचवेळी कारने दादर येथे झाडाला धडक दिली. या अपघातामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.