पुणे - मावळ : शेतकरी संपावर जात आहे ही खूप गंभीर बाब असल्याचं राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये ठिकठिकाणी अस्वस्थता आणि नाराजी निर्माण झाली आहे, त्याची परिणीती आपल्याला या संपामध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टीतून दिसत आहे, त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच योग्य दृष्टीने वेळीच पाऊले टाकली नाही तर या देशामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून परवडणार नाही, देशातील जनतेचा भुकेचा प्रश्न हा संकटात येईल. या संपामुळं शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान होणार आहे. भाजीपाला आणि दूध सारख्या वस्तू देखील फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या सरकारच्या काळातही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, परंतु त्यावेळी आम्ही अकरा हजार कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं होतं. त्यामुळे सरकारने याचा तातडीने निर्णय घ्यावा असं त्यांनी सरकारला सूचवलं आहे.