विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: औरंगाबादमध्ये मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या डॉक्टरने स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेषाद्री गौडा असे या डॉक्टरचे नाव आहे. शेषाद्री गौडा यांना बायपोलार डिसऑर्डर आणि सोशल एन्झायटीचा त्रास होता. या आजाराला कंटाळून गौडा यांनी आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत त्यांनी ही बाब नमूद केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सध्याच्या घडीला भारतातील ४० टक्के लोक या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आहे. बायपोलर म्हणजे दोन टोक, दोन ध्रुव. एकाचवेळी स्वतःला मोठं समजणं आणि दुस-याच क्षणाला निरर्थक समजणं अशी मानसिक परिस्थिती होते. यामुळे व्यक्तीच्या मनात सातत्याने नकारात्मक भावना निर्माण होतात. माझ्या अमूक वागण्याचा लोक काय अर्थ लावतील, याचे विचार सातत्याने येतात. त्यामुळे नैराश्य आणि नकारात्मकता वाढीस लागते. या सगळ्याने टोकाची पातळी गाठल्यानंतर व्यक्ती आत्महत्येपर्यंत येऊन पोहोचते. या मानसिक रोगामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. पण अनेकांना मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणे कमीपणाचे वाटते. परिणामी आजार आणखी बळावतात. त्यामुळे मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ संदीप शिसोदे यांनी दिला आहे.