प्रशांत परदेशी, झी माडिया, धुळे : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण बस अपघातात (Bus Accident) 25 जणांचा जीवंत जळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच धुळ्यात (Dhule News) आणखी दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळ्यात झालेल्या एका विचित्र अपघातात दोन महिलांचा जीव गेला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने चिरडल्याने रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांनी जागीच प्राण सोडले आहेत. तर या अपघातानंतर टपाल घेऊन जाणाऱ्या एका पोस्टमनची मृत्यूशी झुंज सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.
नेमकं काय घडलं?
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरामध्ये आयशर गाडीचा झालेल्या अपघातामध्ये 3 जण चिरडले गेले आहेत. यात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोंडाईचा - शिंदखेडा मार्गांवर शिंदखेडा शहारात प्रवेश करताना भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने विरुद्ध दिशेला जाऊन एका पत्राच्या शेडला धडक दिली. त्यानंतर आयशर गाडी डिव्हायडरला धडकली. या धडकेत समोरून दुचाकीवरुन टपाल घेऊन येणारे पोष्टमन व दोन महिलांच्या अंगावर ही गाडी पलटली. त्यात एक महिला जागीच ठार झाली तर अन्य एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात पोष्टमन गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर आयशर गाडीच्या ड्रायव्हर हा गाडीतच अडकून पडला होता. शिंदखेडा शहरवासियांनी अथक प्रयत्न करून दोन जेसीबीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले. गाडीच्या चालकावर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्याला प्रकृती गंभीर असल्याने धुळे येथे पाठवण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावर गेला 25 जणांचा जीव
शनिवारी रात्री दीडच्या सुमारास बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स महामार्गावरील दुभाजकाला धडकली होती. त्यानंतर बस पलटताच डिझेल टॅंकचा स्फोट झाला आणि संपूर्ण बसने पेट घेतला. या आगीत 25 प्रवाशांसह संपूर्ण बसच जळून खाक झाली आहे