Maharashtra CM : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घवघवीत यशानंतर अजून महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेलं नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी 23 नोव्हेंबरला लागल्यापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस कोणाच्या गळात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार हे गुलदस्त्यात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर मुख्यमंत्री भाजपचा असणार हे जवळपास निश्चित झालं होतं. गुरुवारी रात्री (28 नोव्हेंबर) दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांनी दिलीय.
या बैठकीत अमित शाह यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी खातेवाटपासह मुख्यमंत्रिपदावर चर्चा केली. दीड तास झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलाय.
Expressed my gratitude to Hon Union Minister Shri Amitbhai Shah, for his huge support on the battlefield during the important Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 and for the way he greatly inspired and motivated the karykartas.
On this occasion, our BJP National President JP… pic.twitter.com/KAd341ANtw— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2024
दरम्यान नव्या सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकर पाड पडणार असून मुख्यमंत्रिपदाचा नावाची औपचारिक घोषणेसाठी अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुंबईत आजही महायुतीची महत्त्वाची बैठक आज दुपारी दोननंतर वर्षां बंगल्यावर होणार होती. मात्र ही बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आलीय. या बैठकीत मंत्रिपदांसह भाजपच्या गटनेता निवडीनंतर मुख्यमंत्री ठरणार अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली होती. दरम्यान दिल्लीतून निरोप आल्यावर महायुतीची बैठक होणार आहे, अशी माहिती मिळतेय. आता ही बैठक दोन दिवस पुढे ढकलल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा नावाची घोषणा लांबणीवर गेल्याची चर्चा आहे. तर नव्या सरकारमध्ये 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मंत्रिपदासाठी महिलांचे प्रोफाईल मागवण्यात आले असून यात पंकजा मुंडे, माधुरी मिसाळांच्या नावाची चर्चा आहे.
दुसरीकडे नव्या सरकारचा 2 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या शपथविधीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुतीच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरु झालीय. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची चाचपनी सुरु असल्याची माहिती मिळते. वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क, आणि आझाद मैदान उपलब्ध नसल्याने इतर पर्यायांचा विचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यांतर विदर्भातील बॅकलॉग भरुन काढतील आणि विदर्भाचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. अजितदादा आणि एकनाथ शिंदेंची उपयुक्तता संपल्यात जमा असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी त्यांनी लगावला.