डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय? सावधान ! ग्राहकांची अशी केली जातेय फसवणूक

तुम्ही बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या एका चुकीमुळे हॅकर्स तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम काढून घेऊ शकतात

Updated: Apr 13, 2023, 08:15 PM IST
डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय? सावधान ! ग्राहकांची अशी केली जातेय फसवणूक title=

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : नागरिकांना फसवण्यासाठी सायबर भामटे (Cyber Criminal) सध्या नवनवीन पद्धतीचा अवलंब करत आहेत. कधी बँकेतील रक्कम काढून घेतली जात आहे तर कधी सोशल मिडीयावरून (Social Media) ओळख वाढवून आर्थिक फसवणूक केली जाते. मात्र आता या भामट्यांनी नवीन पद्धत शोधली आहे. यात नागरिकांची फसवणूक करुन त्यांच्या बँक अकाऊंटवर (Bank) डल्ला मारण्याचा प्रयन्त केला जात आहे. 

अशी केली जाते फसवणूक
सायबर भामट्यांनी आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धत शोधली आहे. राष्ट्रीय बँकेचे (National Bank) 'डेबिट किंवा क्रेडीट' कार्ड धारकांना कॉल करून कार्डची मुदत संपली आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर त्या नंबरवर एक लिंक पाठविली जाते. हि लिंक ओपन केल्यानंतर समोर दिसते ती एका बँकेची वेबसाईट. कोणालाही शंका येणार नाही अशी हि वेबसाईट तयार केली जाते. या वेबसाईट वर आपल्या बँकेच्या 'डेबिट किंवा क्रेडीट' (Debit & Credit Card) कार्डचा नंबर, मुदत संपल्याची तारीख आणि गोपनीय असा CVV नंबर टाकावा लागतो. यानंतर प्रोसेस वर क्लिक केल्यावर आपली सर्व माहिती सायबर भामट्यांकडे जाते आणि ते याचा उपयोग करून परस्पर बँक खात्यातून पैसे काढू शकतात किंवा ऑनलाईन खरेदी सुद्धा करू शकतात. 

सायबर भामटे घेत आहेत फायदा 
ग्रामीण आणि शहरी भागात व्यवसाय वाढीसाठी वेबसाईट (Website) तयार केल्या जात आहेत. आणि यासाठी लागणारे होस्टिंग (Hosting) कंपन्यासुद्धा वाढल्या आहेत. काही कंपन्या डोमेन आणि होस्टिंग मोफत देतात तर काही काही कंपन्याकडून पैसे आकारले जातात. सायबर भामटे याचाच फायदा घेत आहेत. मोफत डोमेन आणि होस्टिंग देणाऱ्या कंपनीचा वापर करून राष्ट्रीय बँकेची बनावट वेबसाईट तयार केली जाते. आणि नागरिकांची ऑनलाईन फसवणूक (Online Froud) केली जात असल्याच सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी सांगितल आहे. 

अशी घ्या खबरदारी
सायबर पोलीस (Cyber Police) ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी मंसुरी यांनी काही खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांना केले आहे. कोणतीही बँक 'डेबिट आणि क्रेडीट' कार्ड बाबतच्या माहितीसाठी ग्राहकांना फोनवर करत नाही.  बँके संबधित कोणतीही माहिती ऑनलाईन भरू नये शक्य झाल्यास बँकेत जाऊन माहिती द्यावी.  कोणतीही लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नये. अगोदर त्याची खात्री करून घ्यावी अन्यथा संबधित बँकेत जाऊनच संपूर्ण माहिती द्यावी. आपली फसवणूक झाली असे वाटल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

एखाद्या गोष्टीच्या अज्ञानामुळं याआधी लोकांची आर्थिक फसवणूक व्हायची... मात्र आता सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून अगदी उच्चशिक्षित लोकांनाही आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढलेत... त्यामुळं डिजिटल व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे...