सचिन कसबे, सोलापूर : उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावावर इंदापूर तालुक्यात वळवण्यास मान्यता मिळालेली आहे. उजनी धरणातील शंभर टक्के पाणी वाटप झाले आहे. तरीही पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली वळवल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावरून आज सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनीच पवारांना घरचा आहेर दिला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री असलेले दत्तात्रय भरणे यांनी आपल्या इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी उजनी धरणातून सांडपाण्याच्या नावावर पाच टीएमसी पाणी वळवण्यास मान्यता मिळवून घेतलेली आहे. या निर्णयानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आलेली आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दिपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना जागृत केलेल आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आमदारा च्या दारासमोर हालगी नाद आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे.
आज सांगोला चे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास तीव्र विरोध केलेला आहे. अशा पद्धतीचा निर्णय झाला तर रक्तरंजित लढाईला तयार राहावे असा इशारा त्यांनी महाविकास आघाडीलाच दिला आहे.
राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त बारामती हाच विकास केलेला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आहे. हे देशभर सांगायचं ही पवारांची पद्धत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक या नेत्यांनी नेहमी राज्याचा विकास पाहिला मात्र पवारांनी फक्त बारामतीचा विकास केल्याचा आरोप आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेला आहे.
उजनी धरणातून शरद पवार आणि बारामती एमआयडीसी बारामती शहराच्या पाणीपुरवठा ला पाणी नेलं सिनर्मास प्रकल्प ना पाणी नेलं एवढं पाणी देऊनही जर शरद पवारांना पाणी कमी पडतेय असं वाटत आहे. उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची काय यंत्रणा असती तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं अशी जोरदार टीका आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे
येत्या काळात उजनी धरणाच्या पाण्यावरून पवार विरुद्ध सोलापूर जिल्हा असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.