Coronaupdate : पुण्यात कोरोनाचे सहा बळी; राज्यात २३२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ

कोरोना रुग्णांचा एकूण आकडा पोहोचला...

Updated: Apr 15, 2020, 09:26 PM IST
Coronaupdate : पुण्यात कोरोनाचे सहा बळी; राज्यात २३२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दर दिवशी अधिकाधिक वेगाने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सध्या प्रशासनाच्या चिंतेचा विषय ठरत आहे. बुधवारी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत रुग्णांची आतापर्यंतची संख्या देण्यात आली आहे. 

आरोग्य विभागाच्या यादीनुसार राज्यात बुधवारच्या दिवशी २३२ रुग्णांची नव्याने वाढ झाली. एकट्या मुंबईत बुधवारी कोरोनाचे १४० रुग्ण वाढले. त्यामुळे आता कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा २९१६ वर पोहोचला आहे. 

एकिकडे रुग्णांचा आकडा वाढत असतानाच दुसरीकडे ९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूचीही बुधवारी नोंद झाली. ज्यामध्ये मुंबईचे २ रुग्ण, पुण्याचे ६ रुग्ण आणि अकोला मनपा येथील एका रुग्णाचा समावेश होता. तर, एकूण ३६ रुग्णांना घरीही पाठवण्यात आलं. परिणामी सध्याच्या घडीपर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण २९५ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती समोर येत आहे. 

दरम्यान, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी या आकड्यामध्ये फरक दिसून आला. मंगळवारी कोरोनाचे ३५० रुग्ण नव्याने आढळले होते. तर, दिवसभरात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दिवसभराच्या या आकड्यात काही अंशी घट झाली. पण, रुग्णसंख्या वाढण्याचं हे प्रमाण मात्र अद्यापही सुरुच आहे ही चिंतेची बाब.

 

प्रयोगशाळा तपासणी- 

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या एकूण ५२,००० नमुन्यांपैकी ४८,१९८ रुग्णांचे नमुने ही कोरोना निगेटीव्ह आले. तर, २९१६ अहवाल हे पॉझिटीव्ह आले. 

कोरोनाचा हा प्रादुर्भाव पाहता सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ६८,७३८ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, ५,६१७ लोकं संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.