ठाणे : घोडेबाजारामुळे नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या भिवंडी महानगरपालिकेमध्ये 'अर्थ'पूर्ण सत्तांतर झालं आहे. भाजप आणि काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांच्या मदतीनं कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील महापौरपदी निवडून आल्या. त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रिषिका रांका यांचा ४९ विरुद्ध ४१ अशा ८ मतांनी पराभव केला. त्यामुळं गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस, शिवसेना आघाडीस पायउतार व्हावं लागलं. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस बंडखोर गटाचे इम्रान खान यांनी शिवसेनेचे बाळाराम चौधरी यांचा ८ मतांनी पराभव केला.
भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे एकूण ४७ नगरसेवक आहेत. पण त्यापैकी १८ नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसला मोठा झटका लागला.
भिवंडी महापालिकेत एकूण नगरसेवकांची संख्या ९० आहे. त्यापैकी शिवसेनेचे १२, भाजपचे २०, कोणार्क विकास आघाडीचे ४, समाजवादी पक्षाचे २, आरपीआयचे (एकतावादी) ४ तर १ अपक्ष नगरसेवक आहे. पण बहुमत असूनही काँग्रेसला येथे मोठा झटका लागला.
राज्यात एकत्र आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना आता महापालिका निवडणुकांमध्ये देखील एकत्र येत आहे. पण येथे मात्र बंडखोरांमुळे काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.