'चैत्यभूमीवर जायला मुख्यमंत्र्यांना अद्याप वेळ नाही'

महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या बैठकीला  मुख्यमंत्री आणि काँग्रेस आघाडीचे मंत्री उपस्थित नसल्याची माहिती 

Updated: Dec 4, 2019, 04:13 PM IST
'चैत्यभूमीवर जायला मुख्यमंत्र्यांना अद्याप वेळ नाही' title=

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्ताच्या बैठकीला मुख्यमंत्री अनुपस्थित होते. तसेच त्यांना अजून चैत्यभूमीवर जायला देखील वेळ मिळाला नसल्याचा टोला भाजपचे नेते भाई गिरकर यांनी लगावला आहे. 6 डिसेंबरला 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या बैठकीचे मला निमंत्रण आलं होतं. बैठकीला आलो तेव्हा फक्त सुभाष देसाई मंत्री म्हणून उपस्थित होते, म्हणजे मुख्यमंत्री आणि काँग्रेस आघाडीचे मंत्री उपस्थित नसल्याची माहिती गिरकर यांनी दिली. 

ज्या दिवशी 15 लाख लोकं उपस्थित रहातात, अशा दिवसासंदर्भात महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री उपस्थित नव्हते असे गिरकर म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा ते स्वतः तयारी संदर्भातली बैठक घ्यायचे. उलट राज्यपाल सुद्धा फडणवीस यांच्याबरोबर सकाळी 8 वाजता अभिवादन करायला चैत्यभूमीवर उपस्थित असायचे याची माहिती गिरकर यांनी दिली. देशातील अनेक केंद्रीय मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती हे सुद्धा चैत्यभूमीवर जाऊन आलेले आहेत. मात्र सध्याचे मुख्यमंत्री यांना अजूनही चैत्यभूमीवर जायला वेळ मिळालेला नाही. 

विशेष ट्रेन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या आंबेडकर अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १२ अनारक्षित फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे. नागपुर ते सीएसएमटी (३ फेऱ्या), सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम,अजनी,नागपुर (६ फेऱ्या),अजनी ते सीएसएमटी १ फेरी,सोलापूर ते सीएसएमटी (२ फेऱ्या) धावणार आहेत.

०१२६२ स्पेशल ट्रेन ४  डिसेंबर रोजी रात्री ११ वाजुन ५५ मिनिटांनी नागपुरहुन सुटणार असुन सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजुन ३५ मिनिटांनी पोहचणार आहे. ०१२६४ ट्रेन ५ डिसेंबर रोजी नागपुरहुन सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून सीएसएमटीला त्याच रात्री १२ वाजून  १० मिनिटांनी पोहचणार आहे. ०१२६६ ट्रेन ५ डिसेंबर रोजी नागपुर हुन दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून  सीएसटीएमला दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पोहचणार आहे. या स्पेशल ट्रेनला अजनी, सेवाग्राम, वर्धा, फुलगाव, धामणगाव, बडनेरा,अकोला,मलकापुर,भुसावळ,जळगाव,चाळिसगाव,मनमाड, नाशिक रोड,इगतपुरी, कसारा,कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या तिन्ही ट्रेनला जनरल सेकण्ड क्लासचे १६ कोच असणार आहेत.