Shiv Jayanti 2025: संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या रतयेच्या राजाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख जिथंजिथं होतो तिथंतिथं या राजाला प्रत्येकजण मनोमन मुजरा करत असतो. महाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आसमंतापर्यंत नेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीनवकाळातील प्रत्येक गोष्टीविषयी शिवप्रेमींना कमालीचं कुतूहल वाटतं. यातूनच मग गडकिल्ल्यांच्या भेटी असो किंवा ऐतिहासिक संदर्भांच्या माध्यमातून असो या न त्या मार्गानं तो काळ अनुभवण्याचा अनेकांचाच प्रयत्न असतो.
महाराजांविषयीच्या याच कुतूहलपूर्ण गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांचं राजधानी रायगड येथे असणारं तब्बल 32 मण सोन्याचं सिंहासन. या सिंहासनाविषयी अनेक संदर्भ मांडण्यात आले, ज्यावर उजेड टाकत एका पॉडकास्ट कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक आणि इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी काही गोष्टी उजेडात आणल्या.
सिंहासनाविषयी सांगताना ते म्हणाले, '32 मण सोन्याचं सिंहासन आहे ते. म्हणजे साधारण 1000 किलोहून अधिक सोनं. चित्र्यांनी ते सिंहासन नटवलं असून, कोषामध्ये अर्थात खजिन्यामध्ये असणारी अमौलिक रत्न त्यावर जडवल्याचं आपल्याला वर्णन मिळतं. त्याला आठ दिशांना आठ सिंह होते. त्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शंभू छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. मात्र ते सिंहासन आज तिथे नाही. मग त्या सिंहासनाचं काय झालं?'
32 मण सिंहासनाविषयी घाणेकर यांनी पुढे माहिती देत म्हटलं...'रायगडाविषयी अनेकचा चुकीच्या गोष्टी सांगायच्या आणि त्या लोकांना खरं वाटू लागतात हे दुर्दैव. असं म्हणतात की रायगडावरून ते सिंहासन खाली आणलं आणि पाचाळमध्ये एका शेतात पुरलं असं सांगितलं जातं. गंगासागरामध्ये ते टाकलं असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात त्या सिंहासनाचा चौथरा पाहिला तर कोणत्याही दिशेनं ते हलवून ते कोणत्याच दिशेनं बाहेर येणार नाहीये. मोडतोड करून किंवा त्याचे भाग वेगळे करून ते उभं केलं असेल अशी कुठेही नोंद नाही. तिथून ते गंगासागर तलावात नेणं आणखी अवघड. इतिकाद खान खाली गडाखाली बसलेला असताना कुठे सिंहासन हलवणार? मुळात या राजकुटुंबाची इभ्रत या सिंहासनापेक्षा जास्त होती, यामुळे तो वेळ मिळालाच नाही'.
3 नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड इतिकाद खानाच्या ताब्यात गेला. त्यावेळी त्यानं ते सिंहासून तोडत शत्रूचा माणूस असल्यानं त्याच्या मनात या सिंहासनाविषयीचं पावित्र्य नव्हतं. त्याच्यालेखी त्यानं ते सिंहासन वितळवलं, अशी माहिती घाणेकर यांनी दिली. आपल्या माहितीला आधार देणारे काही पुरावेही त्यांनी मांडले. 'आज तुम्ही रायगडावर पायऱ्य़ा चढून वर गेलात तर तिथं एक चौथरा आहे. तिथं मेघडंबरी आणि त्यात शिवपुतळा आहे. तिथं आपल्या नजरेतून डाव्या हाताला चौथऱ्याच्याच इथं दीडदोन फुटांचे तीन दगड आहेत. ते बेसॉल्ट अर्थात अग्निजन्य खडक आहेत. तिथे एक मोठी चूल मांडण्यात आली आणि कित्येत तास वितळवल्यानंतर त्या सिंहासनातून निघालेल्या सोन्याचे गोळे तयार केले गेले. त्याचमुळे तिथले दडग वितळले. प्रत्यक्षात कोणत्याही बाजूनं कसाही तोफगोळा आला तरी ते वितळणं शक्य नाही, किंबहुना तिथवर तोफगोळा येणं तेव्हा शक्यच नव्हतं. त्यामुळं तिथे जे वितळलेले दगड आहेत तिथे ते सिंहासन वितळवलं गेलं आणि त्यातून मुघल खजिन्याला तेव्हाच्या काळात 50 लाखांची लूट मिळाली त्यात या सोन्याचा समावेश आहे. प्रत्यक्षात दुर्दैवानं अशी कोणतीही नोंद मात्र अस्तित्वात नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं.
किल्ले रायगडावर अशी एक जागा आहे रत्नशाळा किंवा खलबतखाना. हा खलबतखाना राजसदरेपासून काही मिनिट अंतरावर असून, त्यात अनेक गुपितं दडली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज या जागेचा वापर गुप्त खलबतं करण्यासाठी गेला जात होता. पण, ही मध्यवर्ती जागा असल्यामुळं ती खजिन्याची खोली असावी असंही म्हटलं जातं. ही खोली आजही अनेक रहस्य उदरात घेऊन आहे. प्रत्यक्षात खलबतखान्याची मापं घेतल्या निम्मी जागाच दिसते त्यामुळं या खोलीला समांतर खोली असावी असंही म्हटलं जातं. इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी संशोधनाचा हवाला देत याचे संदर्भ दिले. मुघलांच्या हल्ल्यावेळी सिंहासन त्या गुप्त भुयारात आणलं जावं असं म्हटलं तरीही भुयाराचा आणि सिंहासनाचा आकार पाहता ही शक्यता कमी दिसते.
महाराजांच्या खोलीशेजारी धान्य कोठाराच्या बाजूला अशाच पद्धतीची एक खोली, रत्नशाळा किंवा तळघर असल्याचं म्हटलं जातं ज्याच्या उत्खननाची मागणी सध्या केली जात आहे. रायगडावरील गुप्त ठिकाणांचा शोध पुरातत्वं खात्यानं घेतला पाहिजे, अशी मागणी सिंहासनाविषयीची गुपितं उलगडताना सावंत यांनी केली.