टीईटीपाठोपाठ बोगस टायपिंग प्रमाणपत्र घोटाळा? शिक्षण मंडळात लिपिकांचं टायपिंग प्रमाणपत्रं बोगस

'झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन'मध्ये पर्दाफाश, आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्‍यता तीन कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ

Updated: Nov 25, 2022, 06:41 PM IST
टीईटीपाठोपाठ बोगस टायपिंग प्रमाणपत्र घोटाळा? शिक्षण मंडळात लिपिकांचं टायपिंग प्रमाणपत्रं बोगस title=
संग्रहित फोटो

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्यात सर्वात मोठा टीईटी घोटाळा (TET Scam) उघड झाल्यानंतर आता शासनाची संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षाही (Computer Typing Certificate Exam) वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात नव्यानं भरती झालेल्या तीन लिपिकांची (Clerks) शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र बोगस आढळून आलीयेत. शिक्षण मंडळाकडून नुकताच नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या टायपिंग प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. ही प्रमाणपत्र जप्त करण्यात आली असून तीनही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. 

टीईटीपाठोपाठ आणखी एक घोटाळा
राज्य मंडळात नियुक्त झाल्यानंतर मंडळाकडून या नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या टायपिंग प्रमाणपत्रांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून तपासणी करून घेण्यात आली. या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टीईटी पाठोपाठ अशा प्रकारे आता टायपिंग परीक्षेचीही बोगस प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे समोर आल्याने चौकशीत आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

असा आला घोटाळा उडकीस
राज्य मंडळात 2017 साली भरतीची प्रक्रिया ही सुरू झाली आणि 2021 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. यात 262 जागा होत्या त्यातील 200 जागा भरल्या गेल्या. हे उमेदवार जेव्हा हजर होतात तेव्हा त्यांचे सर्टिफिकेट तपासले जातात. इतर प्रमाणपत्रांप्रमाणेच टंकलेखन प्रमाणपत्राची तपासणी केली असता त्यातील 3 जणांचे प्रमाणपत्र बोगस आढळली आहेत. आत्ता यांना सेवामुक्त करण्यात आल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

शासकीय विभागांच्या लेखनिक संवर्गातील नोकरीसाठी हे प्रमाणपत्र बंधनकारक असून, परीक्षा परिषदेकडून त्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. मात्र आता 'टीईटी' पाठोपाठ टायपिंगची प्रमाणपत्रेही बोगस आढळल्याने परीक्षा परिषद पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे. शासकीय नोकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंगच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा घेण्यात येतात. 

तीन कर्माचारी बडतर्फ
कर्मचारी शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येते. टायपिंग परीक्षेची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात येतात. परिषदेकडून संबंधित प्रमाणपत्रावरील सीट नंबर, नाव आणि अन्य माहिती रजिस्टरमधील माहितीशी जुळते की नाही याची तपासणी केली जाते. त्यानंतर प्रमाणपत्र वैध की अवैध यावर शिक्कामोर्तब केला जातो. राज्य मंडळाकडे 262 कर्मचाऱ्यांची नुकतीच भरती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांच्या टायपिंगच्या परीक्षांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. यातील तीन कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रावरील माहिती परीक्षा परिषदेतील रजिस्टरमधील माहितीशी विसंगत असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे ही प्रमाणपत्रे बोगस असल्याने ती जप्त करण्यात आली असून, संबंधित तीनही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.