कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात झालेला पराभव हा भाजपच्या बंडखोरीमुळे झाला आहे. स्थानिक राजकारणामुळे युतीच्या आमदारांचा पराभव झाला आहे. त्याचा दोष आम्हाला देऊ नये. चंद्रकांत पाटील यानीच कोल्हापूर जिल्ह्यात बी टीम तयार केली आणि निवडणुकीत त्यांनी ती उभी केली. त्यांनीच शिवसेनेचे उमेदवार पाडले आहेत. त्यांच्या या कृत्याची पावती ते माझ्यावर फाडत आहेत. मात्र, आमची वृत्ती संपविणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असा जोरदार टोला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवेना खासदार संजय मंडलिक यांनी हाणला आहे.
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी लोकसभेला मला उघड मदत केली; त्यामुळे त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली. मी जे करतो, ते जाहीरपणे करतो. मात्र, शिवसेना उमेदवार पाडायची भाजपची भूमिका होती. इचलकरंजीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव चंद्रकांत पाटील यांच्यामुळे झाला आहे, अशी चर्चा इचलकरंजीमध्ये आहे. दरम्यानस महाडिक प्रवृत्ती भाजपत घेतल्यामुळे लोकांनी भाजपला नाकारले, असा चिमटा संजय मंडलिक यांनी काढला.
आरोप करणे आणि आरोप सिद्ध करणे हे वेगळे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात झालेला पराभव भाजपमधील बंडखोरीमुळे झाला आहे. स्थानिक राजकारणामुळे युतीच्या आमदारांचा पराभव झाला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कागल, चंदगडमध्ये बंडखोर का उभे केले, हे त्यांनी सांगावे. आमची वृत्ती संपविणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असा जोरदार हल्लाबोल मंडलिक यांनी चढवला.