प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडाऱ्यात (Bhandara Accident) माकडामुळे (monkey) एका व्यक्तीचा नाहक जीव गेल्याचा प्रकार समोर आला आहे. भंडाऱ्यात माकडांचा हैदोस थांबता थांबत नाहीये. माकडांनी आता भंडाऱ्यातील विविध गावांमध्य आपले वास्तव्य सुरू केले असून घरांचे नुकसान करत आहेत. आता तर माकडांमुळे नागरिकांचे जीव देखील जात आहेत. भंडाऱ्यात माकडामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Bhandara Police) अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
घरासमोरील पायरीवर बुट पायात घालत असताना छतावरून माकडाने उडी घेतल्याने वीट इसमाच्या डोक्यावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बूट घालत असतानाच या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील रोहनी येथे घडली आहे. भागवत करानकर (47) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. करानकर यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
दुसरीकडे, मंगळवारी देखील लाखांदूर येथे अंगणात उभे असताना माकडाच्या टोळीने छतावर उडी मारल्याने पॅराफिटची वीट दोन्ही पायावर पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. इंदिरा गभने (60) असे गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. भंडाऱ्यातील माकडांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. वन विभागाने मात्र या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना गावातून पकडून दुसरीकडे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही माकडे तिथून सुद्धा दुसऱ्या गावात जाण्याची शक्यता आहे. माकडांच्या वाढत्या संख्येवर कोणतंही नियंत्रण नसल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
फांद्या तोडताना विजेचा धक्का लागून तरुणाचा जागेच मृत्यू
दरम्यान, सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या दुधोंडी येथे विजेचा शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजेंद्र कदम,असे मृताचे नाव आहे. घराच्या दारासमोरून गेलेल्या विजेच्या ताराला अडथळा ठरणारे झाडाच्या फांद्या तोडत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र कदम हे आपल्या घराच्या छतावर उभे राहून तारांना अडथळा ठरत असलेल्या झाडाच्या फांद्या तोडताना,11 हजार केव्हीचा झटका लागल्याने राजेंद्र कदम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दुधोंडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.