अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी महिलांची गर्भपिशवी अवैधरित्या काढण्याचा मुद्दा विधानपरिषदमध्ये आज गाजला. गेल्या 3 वर्षात बीड जिल्ह्यात ऊस तोडणी महिलांच्या 4605 गर्भपिशव्या काढण्यात आल्याचा मुद्दा नीलम गोर्हे यांनी उपस्थित केला. तेव्हा या प्रकरणात चौकशी करून संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी गोर्हे यांनी केली. हाच मुद्दा विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, विद्या चव्हाण, मनीषा कायंदे यांनी लावून धरला.
तेव्हा गर्भपीशव्या अवैधरित्या काढण्यात आल्या आहेत का ?, या सर्व प्रकरणाची आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. या समितीमध्ये महिला आमदार, स्त्री रोग तज्ञ यांचा समावेश असणार आहे. ही समिती बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकरणाबाबतचा अहवाल दोन महिन्यात देणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आलं. तसंच महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याच्या शस्त्रक्रियेबाबत राज्यासाठी एक SOP तयार केलं जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आलं.
दरम्यान ऊस तोडणी महिला कामगार महिलांची आरोग्य केंद्रात वर्षातून 2 वेळा तपासणी यापुढे केली जाईल याची घोषणाही यावेळी आरोग्यमंत्री यांनी यावेळी केली.