बीड : बीडमध्ये रविवारी दुपारी भरलग्नात भलताच प्रकार घडला. नवरदेवाचा बूट नवरीच्या भावानं लपवल्याचं निमित्त झालं आणि त्यावरून झालेल्या हाणामारीत नवरदेवाचं डोकं फुटलं. रविवारी दुपारी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या कुंभेफळ या गावी हा प्रकार घडला. तुळजापूरच्या साडी सेंटरमध्ये काम करणाऱ्या सुलतान युनूस शेखचा विवाह काल नबी सिकंदर शेख यांच्या मुलीशी होणार होता. लग्नाआधी मुलीच्या भावानं नवरदेवाचे जोडे चोरल्यानं वादाला सुरूवात झाली. त्यातून मारहाणीची घटना घडली. परंतु हा वाद सामोपचारानं मिटवण्यात आला. त्यानंतर लग्नही झालं. पण महिला जेवत असताना लग्नाआधीचा वाद पुन्हा उफाळून आला. त्यावरून पुन्हा जोरदार धुमश्चक्री सुरू झाली.
नवरदेवानं बांधलेल्या मुंडावळ्या आणि सेहरा फेकून दिला. तेव्हा संतापलेल्या सासऱ्यानंच नवरदेवाच्या डोक्यात लाकूड मारलं. त्यामुळे नवरदेवाच्या डोक्याला सहा टाके पडले. सुलतानवर केजच्या सरकारी रुग्णालयात उपचार झाल्यावर नवऱ्याकडची मंडळी युसूफ वडगावच्या पोलीस स्टेशनला गेली. मात्र ही मंडळी पोलीस स्टेशनला गेल्याचं कळताच वधूकडच्या मंडळींनी मुलाकडच्या वऱ्हाडी मंडळींचा टेम्पो अडवून ठेवला. त्यावरून तणाव निर्माण झाल्यानंतर अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. झाल्या प्रकारानं चिडलेल्या सासऱ्यानं अखेर झालेलं लग्न मोडून आपल्या मुलीला तलाक घ्यायला लावला.