जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला (Akola) येथील भाजपाच्या (BJP) ज्येष्ठ नेत्या नयनाताई मनतकार (nayana manatkar) यांचे पती अविनाश मनतकार (Avinash Manatkar) यांनी नागपूर येथील अजनी रेल्वे स्थानकाजवळ आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रेल्वेसमोर उडी घेऊन मनतकार यांनी आपली जीवन यात्रा संपवलीय.अविनाश मनतकार हे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या आणि अकोला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती नयना मनतकार यांचे पती आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी मनतकार दाम्पत्यावर आरोप झाल्याने ते व्यथित झाले होते.आत्महत्येपूर्वी मनतकार यांनी एक सुसाईड नोट लिहिल्याचंही समोर आले आहे. या सुसाईड नोटमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एका माजी आमदार आणि अकोला शहरातील एका पोलीस ठाणेदारच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच नमूद करण्यात आलंय.
अविनाश मनतकार तेल्हारा तालुक्यातील मनात्री गावचे रहिवासी होते. काही दिवसांपूर्वी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणात मनतकार दाम्पत्यावर गंभीर आरोप झाले. त्यानंतर त्यांनी टोकांच पाऊल उचललं आहे. अविनाश मनतकार आणि नयना मनतकार दोघेही गुरुवारी नागपूरला गेले होते. त्यानंतर शेगावला जायचे आहे, असे सांगून अविनाश मनतकार बाहेर पडले. मात्र रात्रीपर्यंत अविनाश मनतकार परतलेच नाही. त्यानंतर नयना मनतकार यांनी ते बेपत्ता झाल्याची माहिती दिली. मात्र तपासानंतर अविनाश मनतकार यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.
दरम्यान, अविनाश मनतकार यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या एका चिठ्ठीत भाजपचे मलकापूर माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांचे नाव या पत्रात लिहीले आहे.मला आणि माझ्या पत्नीला बॅँकेच्या खोट्या भ्रष्टाचारात गोवण्यात आलं असल्याचं त्यांनी या पत्रात म्हंटलंय. या सोबतच लखानी नामक व्यक्तीचाही त्यांनी उल्लेख केला आहे. तर अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी सुद्धा तपासाच्या नावाने 38 लाख रुपये उकळले असल्याचंही त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे भाजपच्या एका जेष्ठ नेत्यावर आणि पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.