मतदान केंद्रावर ट्रॅक्टर ट्रॉली एकमेकांना जोडून तयार झाला मतदार राजासाठी पूल

बारामती तालुक्यातल्या कांबळेश्वर इथल्या मतदान केंद्रासमोर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय

Updated: Oct 21, 2019, 03:36 PM IST
मतदान केंद्रावर ट्रॅक्टर ट्रॉली एकमेकांना जोडून तयार झाला मतदार राजासाठी पूल title=

बारामती : आज विधानसभा निवडणूक २०१९ साठी आज राज्यभर मतदान पार पडतंय. दुपारी १.०० वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३० टक्के मतदानाची नोंद झालीय. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ३३ टक्के मतदानाची नोंद झालीय एकंदरच मतदानासाठी आधीच मतदार फारसे उत्सुक नसल्याचं चित्र आहे त्यातच राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसानंही गोंधळ घातलाय. असंच काहीसं चित्र बारामती तालुक्यातही आहे. परंतु, जागरुक मतदारांनी स्वत:च त्यावर उपाय शोधून काढला आणि इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहीत केलं. बारामती तालुक्यातल्या कांबळेश्वर इथल्या मतदान केंद्रासमोर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळं इथल्या ग्रामस्थांनी मतदान केंद्राबाहेर तब्बल सहा ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या एकास एक जोडून सुमारे ५० फूट लावल्या. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या पायघड्या घातल्याचं चित्र दिसून येतंय. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला. पवारांनी मुंबईत मतदान केलं तर पवारांच्या कुटुंबीयांनी बारामतीत मतदान केलं. शरद पवार वगळता संपूर्ण पवार कुटुंबाने बारामतीत मतदान केलं. बारामतीत संपूर्ण पवार कुटुंबाने मतदान केलं. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि अन्य पवार कुटुंबीयांनीही यावेळी मतदान केलं. मतदान केल्यावर सर्व पवार कुटुंबाने सेल्फीसाठी पोझही दिली.