शशिकांत पाटील, झी २४ तास, लातूर : मंगळवारी भाजपानं विधानसभा निवडणूक २०१९ साठी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर कुठे हसू तर अनेक जणांचा हिरमोड झालेला दिसला. काही जण मूग गिळून गप्प बसले तर काही जणांनी बंडांचा झेंडा फडकावलाय. सत्ताधारी भाजपमधील मराठवाड्यातील पहिली बंडखोरी ही लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे झाली आहे. भाजपचे अहमदपूर येथील जुने स्थानिक नेते दिलीप देशमुख यांनी बंडखोरी करून उमेदवारी दाखल केली आहे.
अहमदपूरमधून भाजपाने विद्यमान आमदार विनायकराव जाधव पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दिलीप देशमुख यांनी अहमदपूरमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी दाखल केला.
२० वर्षांपासून दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंमुळे दिलीप देशमुख भाजपमध्ये काम करत होते. गेल्या दोन विधानसभेत ते भाजपचे विधानसभा निवडणुकीतील प्रमुख दावेदार होते. मात्र, त्यांना तिकीट न देता भाजपने हुलकावणी दिली होती. त्यामुळे यावेळेस भाजपचे तिकीट मिळाले तर ठिक अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केलं होतं. त्यानुसार आता या निवडणुकीत आपण अपक्ष म्हणून लढणार असल्याचे दिलीप देशमुख यांनी जाहीर केलं आहे. पक्ष नेतृत्वानेच काय तर साक्षात देवाने जरी सांगितले तर आपण माघार घेणार नसल्याचे दिलीप देशमुख यांनी यावेळी म्हटलंय.
दरम्यान, भाजपाच्या पहिल्या यादीत ५२ आमदारांना पुन्हा एकदा संधी दिलेली दिसून येतेय तर १२ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं गेलंय. या यादीत १२ महिलांच्या नावाचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून भाजपात आलेल्या आयारामांनाही या यादीत प्राधान्य मिळालेलं दिसतंय. राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, संदीप नाईक, बबनराव पाचपुते, जयकुमार गोरे, वैभव पिचड, राणा जगजितसिंह, शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपाकडून तिकीट देण्यात आलंय. परंतु, एकनाथ खडसे, विनोद तावडे, राज पुरोहीत आणि प्रकाश मेहता या चर्चित नावांचा मात्र भाजपाच्या पहिल्या यादीत समावेश नाही.