मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका- अजित पवार

पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचे राजकारण होते.

Updated: Dec 16, 2018, 06:23 PM IST
मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका- अजित पवार title=

बारामती: मला भावी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांना भावी पंतप्रधान म्हणू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ते रविवारी बारामती येथील एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात अजित पवारांच्या भाषणापूर्वी एका स्थानिक नेत्याने त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला. हाच धागा पकडत अजित पवारांनी 
म्हटले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीला बहुमत कसे मिळेल, याकडे प्रथम लक्ष दिले पाहिजे. पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचे राजकारण होते. या पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे, असे अजित पवारांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

याशिवाय त्यांनी माजी खासदार निवेदिता माने यांच्या शिवसेना प्रवेशाविषयीही भाष्य केले. शेवटी कुणी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी भाजपलाही लक्ष्य केले. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारकडून थातूरमातूर उत्तर दिली जातायंत. पाच राज्यातील निवडणूक निकालात भाजपाची पिछेहाट झाली. त्यामुळे कर्जमाफी देऊन गमावलेला जनाधार मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाकडून सुरु असल्याचीही टीका त्यांनी केली.