गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी या वर्षातील सर्वात यशस्वी कारवाई करत महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर ७ नक्षलवाद्यांना टिपलंय. सिरोंचा तालुक्यातील सीमावर्ती झिंगानूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कल्लेड जंगलात पोलिसांनी ही मोठी कारवाई केलीय.
गेले १५ दिवस जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी डोकं वर काढत जिल्ह्यातील विविध जंगलात मोठ्या हिंसात्मक कारवाया केल्या होत्या. याविरोधात जनतेत मोठा आक्रोश होता.
या नक्षली हिंसेनंतर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम यांनी गडचिरोलीत तळ ठोकला आहे.
त्यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस अधीक्षकांनी राज्याच्या सीमावर्तीय क्षेत्रात जोरदार नक्षल शोध अभियान छेडलं होतं.
सिरोंचा तालुक्यात नक्षलशोध मोहिमेदरम्यान कल्लेड जंगलात पोलीस- नक्षल चकमक उडाली. यात गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाने प्रत्त्युत्तर दिले.
यात ७ नक्षलवादी ठार झाले. हे सर्व मृतदेह पोलिसांच्या ताब्यात असून या चाकांची आणखी काही नक्षली मारले गेल्याची शक्यता वारसीहत पोलीस अधिका-यांनी व्यक्त केली आहे.
मृतांमध्ये ५ महिला आणि २ पुरुष नक्षली आहेत. तर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या भागात मोठ्या कारवाईनंतर नक्षल्यांवर अधिक दबाव वाढविण्यासाठी मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात केला गेला आहे.
२ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षलवाद्यांनी आपल्या भूमिगत सेनेच्या स्थापनेनिमित्त बंद पुकारला आहे. यामुळे दहशतीने जिल्ह्याच्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.