दीपक भातुसे, झी मीडिया, सिंधुदुर्ग: सध्या राजकारणात माझा उताराचा काळ सुरु आहे. ही गोष्टी मी स्वीकारली आहे. त्यामुळेच मी सध्या गप्प बसायचे ठरवले आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले. नारायण राणे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत आगामी काळातील राजकीय वाटचालीसंदर्भात भाष्य केले.
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर नारायण राणे यांना तिकडची संस्कृती फारशी मानवली नव्हती. त्यामुळे आता भाजपमध्ये गेल्यास राणे आपल्या स्वभावाला मुरड कशी घालणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, आपण भाजपच्या संस्कृतीशी जुळवून घेऊ, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. माझ्या स्वातंत्र्याला मर्यादा येत असतील तर मी संबंधितांशी बोलेन. पण इतरवेळी आपण भाजपच्या ध्येयधोरणांनुसार वागायचा प्रयत्न करु. आता ते कितपत जमेल, हे येणार काळच ठरवेल, असे राणे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या एकातरी आमदाराने नितेश एवढं काम केलंय का- नारायण राणे
यावेळी नारायण राणे आपण शिवसेनेच्या विरोधाला फारशी किंमत देत नसल्याचेही सूचित केले. शिवसेना म्हणजेच महाराष्ट्राचे राजकारण आहे का? भाजपमधील निम्म्या नेत्यांचे शिवसेनेशी जुळत नाही. त्यामुळे अशा गोष्टींनी फार काही बदलत नसते, असे राणेंनी सांगितले.
शिवसेनेबाबतच्या भूमिकेवरून राणे बंधूंमध्ये मतभेद
तुर्तास मला शिवसेनेविषयी काही बोलायचे नाही. त्यांनी माझ्यावर टीका केल्यास काय करायचे ते मी पाहून घेईल. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेशी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला तर त्याला मी प्रतिसाद देईन, असे राणे यांनी स्पष्ट केले.