बंगळुरू : मला इनोव्हा गाडी आवडत नाही त्यामुळे फॉर्च्युनर गाडी द्या. लहानपणापासूनच मला मोठ्या गाड्या चालवण्याची सवय आहे, असं वक्तव्य कर्नाटकच्या एका मंत्र्यानं केलं आहे. मंत्र्याच्या या वादग्रस्त मागणीनंतर भाजपनं यावर टीका केली आहे तर काँग्रेसनं या मागणीचा बचाव केला आहे. कर्नाटकचे खाद्य आणि नागरिक पुरवठा मंत्री जमीर अहमद खान यांनी ही मागणी केली आहे. जमीर अहमद खान यांना टोयोटा इनोव्हा गाडीची मंजुरी देण्यात आली. पण ही गाडी कमी स्तराची असून आपल्याला फॉर्च्युनर हवी, असं खान म्हणाले.
मी एका व्यापारी परिवारातून येतो. लहानपणापासूनच मी मोठ्या गाड्या चालवतो. पण मला इनोव्हा गाडीची परवानगी देण्यात आली. इनोव्हा गाडी मला आरामदायक वाटत नाही. ही गाडी छोट्या स्तराची आहे, असं वक्तव्य खान यांनी केलं. २-३ एसयूव्हींची वाटणी अजूनही झालेली नाही. यातली एक एसयूव्ही माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या वापरत होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जमीर अहमद खान यांच्याकडे १०० लक्झरी बस आहेत. त्यांनी स्वत:ची गाडी वापरली पाहिजे, अशी मागणी भाजपनं केली आहे. तर मंत्र्याकडून अशी मागणी येण्यात काहीही गैर नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस खासदार सैय्यद नासीर हुसैन यांनी दिली आहे. मीडिया कारण नसताना या मुद्द्याला हवा देत असल्याचंही हुसैन म्हणाले.
मुख्यमंत्री कुमारस्वामी स्वत:ची रेंज रोवर गाडी वापरतात मग तुम्ही सरकारी गाडीची मागणी का करताय असा सवाल खान यांना विचारण्यात आला. तेव्हा कुमारस्वामींना सगळे जण ओळखतात. त्यांना ओळखीची गरज नाही कारण ते लोकप्रिय नेते आहेत. पण मी फक्त एक मंत्री आहे. माझी इच्छा आहे. ही संधी मिळणं खूप कठीण असतं, असं उत्तर जमीर अहमद खान यांनी दिलं.