भूकंपाच्या वेळी नेमकं काय कराल? जाणून घ्या काही महत्त्वाच्या सुरक्षा टीप्स

दिल्लीमध्ये सोमवारी पहाटे भूकंपाचे झटके बसल्याची बातमी समोर आली. भूकंपामुळे बरेच नुकसान होत असल्याचे आपल्याला माहितच आहे. पण अशा परिस्थितीत त्या ठिकाच्या स्थानिकांना कोणती हानी होऊ नये, याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. मग भूकंपाच्या वेळी नेमकं काय कराल? जाणून घ्या.

Updated: Feb 17, 2025, 03:40 PM IST
भूकंपाच्या वेळी नेमकं काय कराल? जाणून घ्या काही महत्त्वाच्या सुरक्षा टीप्स

Delhi Earthquake: दिल्ली-NCR मध्ये आज सकाळी 5:36 वाजता भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.0 ऐवढी मोजली गेली असून, याचे केंद्र 5 किलोमीटर खोलीवर होते. या भूकंपाच्या झटक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत भूकंपाच्या वेळी सुरक्षित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

भूकंपाच्या वेळी काय करावे?

1. घराच्या आत असाल तेव्हा काय करावे?

  • घराच्या आत असाल तर शक्यतो मजबूत टेबल किंवा पलंगाखाली लपून बसावे.
  • जर टेबल उपलब्ध नसेल, तर जमिनीवर वाकून बसून हातांनी डोकं आणि चेहरा झाका.
  • काच, खिडक्या, बाहेरच्या भिंती आणि झडणाऱ्या वस्तूंपासून लांब उभे राहा.
  • लिफ्टचा वापर करणे टाळा. भूकंपाच्या वेळी तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट बंद पडू शकते.
  • भूकंप थांबेपर्यंत एका सुरक्षित ठिकाणी स्थिर राहा.

2. घराच्या बाहेर असाल तेव्हा काय करावे?

  • मोकळ्या जागेत उभे राहा आणि इमारती, झाडे, वीजवाहिन्या यापासून दूर राहा.
  • मोठमोठ्या इमारतींच्या जवळ उभे राहू नका, कारण भिंती किंवा काच कोसळण्याचा धोका असतो.
  • भूकंप थांबेल तोपर्यंत एका सुरक्षित ठिकाणी स्थिर उभे राहा.

3. गाडीत असाल तेव्हा काय करावे?

  • शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवा.
  • पुलाखाली किंवा उंच इमारतीजवळ थांबू नका.
  • भूकंपाचे झटके बंद झाल्यावर रस्त्याची स्थिती तपासून मगच पुढे निघा.
  • क्षतिग्रस्त किंवा तुटलेल्या पुल, ब्रीज किंवा रस्त्याचा वापर करू नका.
  • हे मार्ग अचानक कोसळून पडू शकतात.

4. भूकंपानंतर काय करावे?

  • विजेचे उपकरण वापरणे टाळा.
  • गॅस गळतीची शक्यता असल्यामुळे लाइटर पेटवू नका.
  • शक्यतो, फोनच्या फ्लॅशलाइटचा वापर करून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
  • शुद्ध पाणी नसेल, तर ओलसर कपड्याने ओठ ओले करा.
  • भूकंपाच्या वेळी घाईगडबड करू नका आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वरील उपायांचा अवलंब करा.