Rajasthan Crisis: 'मग शेखावत व्हॉईस सॅम्पल द्यायला का घाबरत आहेत'; काँग्रेसचा सवाल

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून बुधवारी विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Jul 19, 2020, 04:02 PM IST
Rajasthan Crisis: 'मग शेखावत व्हॉईस सॅम्पल द्यायला का घाबरत आहेत'; काँग्रेसचा सवाल title=

जयपूर: राजस्थानमधील सरकार उलथवून टाकण्यासंदर्भात संभाषण असलेल्या ऑडिओ क्लीपवरून काँग्रेस पक्ष आणखीनच आक्रमक झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा राजीनामा मागितला आहे. तसेच या कारस्थानात शेखावत सहभागी नसतील तर ते आवाजाचे नमुने (व्हॉईस सॅम्पल्स) द्यायला का घाबरत आहेत, असा सवाल काँग्रेस नेते अजय माकन यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने राजस्थान सरकारकडून फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. या क्लीपमुळे भाजप अडचणीत आली आहे. मात्र, काँग्रेस सरकारने फोन टॅप करून खासगीपणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केला आहे. 

राजस्थानच्या फोन टॅपिंग प्रकरणात नवा ट्विस्ट; गृहमंत्रालयाने मागितले रिपोर्ट

राजस्थान सरकारने ही क्लीप समोर आल्यानंतर गुन्हाही दाखल केला होता. यानंतर राजस्थान पोलिसांचे विशेष पथक SOG सचिन पायलट गटाच्या आमदारांना ठेवण्यात आलेल्या मानेसर येथील हॉटेलवर पोहोचले होती. मात्र, हरियाणा पोलिसांनी राजस्थान पोलिसांना आमदारांची भेट घेऊन दिली नव्हती. त्यामुळे आता राजस्थानमधील राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे. मात्र, गजेंद्रसिंह शेखावत यांनी ही ऑडिओ क्लीप बनावट असल्याचा दावा केला आहे. 

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून बुधवारी विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे. यावेळी गेहलोत सरकारकडून सभागृहात बहुमत सिद्ध केले जाण्याची शक्यता आहे. २०० जागांचे संख्याबळ असलेल्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसकडे १०९ आमदार असल्याचा गेहलोत यांचा दावा आहे. त्यामुळे आता विधानसभेत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सध्या काँग्रेसच्या आमदारांनाही दगाफटका टाळण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.