श्रावणी सोमवार निमित्त (Sawan Somwar) देशभरात भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांकडून पूजा करण्यात येत आहे. भगवान शंकराच्या मंदिरात अभिषेक करण्यासाठी भाविकांकडून गर्दी केली जात आहे. सामान्यांपासून ते राजकारण्यांपासून सर्वच जण भगवान शंकराच्या मंदिरात गर्दी करत आहेत. अशातच उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका मंत्र्याने महादेवाच्या मंदिरात केलेल्या कृतीमुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. उत्तर प्रदेशच्या या मंत्र्याने मंदिरात पूजा केल्यानंतर शिवलिंगाजवळच (Shivling) हात धुतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे मंत्र्यावर लोकांनी टिकेची झोड उठवली आहे.
उत्तर प्रदेशच्या भाजपा सरकारमध्ये अन्न पुरवठा खात्याचे राज्यमंत्री असलेल्या सतीश श (Satish Sharma) र्मा यांनी हे कृत्य केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सतीश शर्मा हे मंदिरातील शिवलिंगाजवळ हात धुताना दिसत आहे. सतीश शर्मा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांचा विश्वास केवळ राजकारण करण्यावर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. शिवलिंगाजवळ भाजपाच्या मंत्र्याने मोठा अन्याय केल्याचे समाजवादी पक्षाचे म्हणणे आहे.
बाराबंकीच्या रामपूर भागात असलेल्या पौराणिक लोधेश्वर महादेव मंदिरात हा सगळा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ 27 ऑगस्टचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये मंदिरात सतीश शर्मासोबत उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री जितिन प्रसाद हात जोडून उभे आहेत. त्याचवेळी मंत्री सतीश शर्मा पुजार्याकडे बोट दाखवत काहीतरी बोलतात. यानंतर पुजारी एका भांड्यातून सतीश शर्मा यांना पाणी देतात. त्यानंतर सतीश शर्मा शिवलिंगाजवळ त्या पाण्याने हात धुत आहेत.
विरोधकांनी धरलं धारेवर
"उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सतीश शर्मा हे शिवालयातील शिवलिंगाला स्पर्श केल्यानंतरच हात धुत आहेत. आणखी एक मंत्री जितिन प्रसाद त्यांच्या शेजारी उभे आहेत आणि ते सगळं पाहत आहेत. धर्माच्या नावावर, देवी-देवतांच्या नावावर राजकारण करणाऱ्या आणि खुर्चीवर बसणाऱ्या या लोकांना शिवलिंगाजवळ हातही धुतले जात नाहीत याची अक्कलही नाही. या अज्ञानी लोकांसाठी आमची श्रद्धा, आमची श्रद्धा, आमचे देवी-देवता हे केवळ राजकीय हेतू पूर्ण करण्याचे साधन आहे. त्याहून अधिक, त्यांचा ना देवावर विश्वास आहे, ना जनतेच्या विश्वासावर," असे ट्वीट उत्तर प्रदेश काँग्रेसने केले आहे.
उत्तर प्रदेश सरकार के मंत्री सतीश शर्मा शिवालय में शिवलिंग के अर्घ्य से सटाकर ही हाथ धो रहे हैं।
बगल में एक और मंत्री जितिन प्रसाद खड़े होकर टकटकी निगाह से देख रहे हैं।
धर्म के नाम पर, देवी-देवताओं के नाम पर राजनीति करने वाले और कुर्सी पर बैठने वाले इन नीचों के पास इतनी… pic.twitter.com/VD43Fw3YAB
— UP Congress (@INCUttarPradesh) September 3, 2023
सतीश शर्मांनी दिले स्पष्टीकरण
शिवलिंगावर हात धुवल्याप्रकरणी मंत्री सतीश शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाणी, मध, दूध आणि इतर गोष्टींनी अभिषेक केल्यास हातात असलेल्या या वस्तू बाहेर घेऊन जात नाहीत. हातातील साहित्य शिवलिंगाजवळ ठेवले जाते. ते इतर कोठेही साफ करत नाहीत, असे स्पष्टीकरण सतीश शर्मांनी दिले आहे. सतीश शर्मा यांच्या मते, या प्रकरणाचे विनाकारण राजकीय मुद्दा बनवून राजकारण केले जात आहे.