Sitamarhi Lighting Video: सोशल मीडियावरील रील हे सध्या चर्चेचे विषय ठरत आहेत. रीलसाठी तरुणाई अनेक धोक्याचे मार्गही वापरत आहेत. सोशल मीडियावर रील अपलोड करणे हा आता छंद झाला आहे. अनेकजण रीलच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. अनेक जण व्हिडिओ यूट्यूबसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करत आहेत. पण अनेकजण लाइक्स अँड कमेंट्ससाठी हद्द पार करतात. यात अनेकजणांना जीवदेखील गमवावे लागले आहेत. बिहारच्या सीतामढी येथेही असाच एक प्रकार घडला आहे. रील बनवण्याच्या नादात एका मुलीच्या जीवावर बेतले असते.
सीतामढी जिल्ह्यात खूप दिवसांनंतर मंगळवारी जोरदार पाऊस झाला. बुधवारीदेखील पावसाचे वातावरण कायम होते. या पावसात अनेक तरुण-तरुणी रील बनवण्यासाठी बाहेर पडले होते. जिल्ह्यातील सिरसिया गावातील रहिवाशी सानिया कुमारी ही देखील तिच्या शेजाऱ्यांच्या गच्चीवर पावसात रील बनवत होती. ती पावसांत डान्स करत असतानाचा एक व्हिडिओ बनवत होती. तिची मैत्रिण तिचा व्हिडिओ काढत होती. व्हिडिओ बनवत असतानाच पाठीमागे वीज कडाडली
सानिया जिथे व्हिडिओ बनवत होती त्याच्या ठीक पाठीमागेच वीज कडाडली. सुदैवाने सानियाला कोणतीही इजा झाली नाही आणि तिच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाला नाही. मात्र, या थरारक घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रील्स बनवण्याची हा छंद तरुणाईच्या जीवावर उठत आहे.
दरम्यान, किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरातवर हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रापासून केरळच्या किनारपट्टीवर हवेची द्रोणीय रेषा निर्माण झाली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही हवामानविषयक स्थिती मोसमी पावसासाठी पोषक आहे.