नवी दिल्ली - केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारशी काही मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे कारण देत राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पी. सी. मोहनन आणि जे. व्ही मीनाक्षी अशी या सदस्यांची नावे आहेत. सरकारसाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग ही देशातील महत्त्वाची संस्था आहे. मोहनन हे या संस्थेचे प्रभारी अध्यक्षही होते.
राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाकडे सध्या केवळ चार सदस्य होते. त्यापैकी दोघांनी राजीनामा दिल्यामुळे आता आयोगाकडे केवळ दोनच सदस्य उरले आहेत. त्यामध्ये मुख्य सांख्यिकी तज्ज्ञ प्रविण श्रीवास्तव आणि निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचा समावेश आहे. राजीनामा दिल्यानंतर मोहनन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, सध्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोग परिणामकारक राहिलेला नाही. त्याचबरोबर या स्थितीत आयोगाचा कारभार सांभाळणे शक्य नसल्यामुळे मी राजीनामा दिला आहे.
आयोगाकडे एकूण सात सदस्य असले पाहिजेत, असे केंद्र सरकारच्या या संदर्भातील वेबसाईटवर लिहिलेले आहे. मोहनन आणि मीनाक्षी हे दोघेही जून २०१७ मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी आयोगामध्ये रुजू झाले होते. त्यांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये संपुष्टात येणार होता. पण त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे देशातील आणखी एक महत्त्वाची संस्था मरणासन्न अवस्थेत पोहोचली आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. या घटनेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.