Rent Agreement : हक्काचं घर हवं, असं स्वप्न प्रत्येकजण पाहतो पण, प्रत्येकालाच हे स्वप्न साकारता येतं असं नाही. अनेकजण या स्वप्नासाठी प्रचंड मेहनत करतात. पण, कुठे ना कुठे गणित बिनसतं आणि घराचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. अशा परिस्थितीत भाड्याच्या एखाद्या घरात राहण्याला अनेकजण प्राधान्य देतात. नोकरी, शिक्षण किंवा इतर कोणत्याही कारणानं कुटुंबापासून दूर राहणारी अनेक मंडळी भाड्याच्या घरात राहतात.
एखाद्या व्यकतीचं घर भाड्यानं घेणं म्हणजे एका लिखित स्वरुपातील करार. हा करार या व्यवहारांमध्ये रेंट अॅग्रिमेंट म्हणूनही ओळखला जातो. एखादं घर भाड्यानं घेण्याच्या प्रक्रियेत ही सर्वात मोठी प्रक्रिया आणि कागदोपत्री पुरावा मानला जातो. ज्यावर घरमालकाचं नाव, भाडेकरुचं नाव, साक्षीदाराची स्वाक्षरी अशा गोष्टी असतात. भविष्यात या व्यवहारात कोणतीची अडचण उदभवल्यास रेंट अॅग्रीमेंटच मदतीची ठरते. पण, त्यात काही गोष्टींबाबत स्पष्टता असणं कधीही फायद्याचं. चला पाहूया त्या गोष्टी कोणत्या....
रेंट अॅग्रीमेंटवर अनेक प्रकारचे नियम व अटी असतात. त्यामुळं तुम्ही एखादं घर भाड्यानं घेत असाल तर, त्यात घरमालकानं कोणत्या छुप्या रकमेचा किंवा पेनल्टीचा उल्लेख तर केला नाहीये ना याची तपासणी करा. याशिवाय पाणीपट्टी, मेंटन्स, स्विमिंग पूल, पार्किंग इत्यादीचे पैसे आकारले जात नाहीयेत ना हे तपासून घ्या.
घरमालकाला तुम्ही किती भाडं देणार आणि तो तुमचं भाडं नेमकं कधी वाढवणार हे सुरुवातीलाच ठरवा. महिन्याला दिल्या जाणाऱ्या भाड्याचा उल्लेख अॅग्रीमेंटवर असावा. पण, भाडं वाढवण्याचा कोणताही उल्लेख इथं नसल्यास घरमालक त्यासाठी आग्रही असूनही तुम्ही इथं घासाघीस करु शकता.
तुम्ही ज्या घरात राहता तिथं वेळोवेळी काही गोष्टींची डागडुजी, रंगकाम आणि तत्सम गोष्टींची गरज भासते. अशा परिस्थितीत हा खर्च नेमका कोण करणार हेसद्धा रेंट अॅग्रीमेंटमध्ये नमूद असावं. एखादा अपघात झाल्यास घराच्या दुरुस्तीची जबाबदारी कोणाची असेल हे अॅग्रीमेंटमध्ये स्पष्ट केलेलं असावं.
वरील गोष्टींव्यतिरिक्त घर भाड्यावर घेण्यापूर्वी डिपॉझिटची रक्कमही अॅग्रीमेंटवर नमूद केलेली असावी. ज्यामुळं घरमालक आणि तुमच्यामध्ये असणारे बहुतांश व्यवहार सोपे होतील. रेंट अॅग्रीमेंटवर सही केल्यानंतर त्याची एक प्रत स्वत:कडे ठेवायला अजिबात विसरु नका.