Superhero Stunt : लहान मुलांमध्ये सुपरहिरोची (Superhero) प्रचंड क्रेझ असते. सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, आर्यनमॅन असे सुपरहिरो लहान मुलांचे आयडॉल (Idol) असतात. त्यांचं हवेत उडणं, शत्रुला मारणं याचं अनुकरण लहान मुलं करत असतात. आपण त्यांच्यासारखंच सुपरहिरो बनायचं, हवेत उडायचं, शत्रूचा खात्मा करायचा असं प्रत्येक लहान मुलाला वाटत असतं. काल्पनिक जग आणि वास्तविक जग यांच्यातील फऱक पालकांनी मुलांना समजावून सांगण्याची गरज असते. मुलांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर विपरीत घटनाही घडू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
विद्यार्थ्याने मारली उडी
विद्यार्थ्यांमध्ये सुपरहिरोवरुन लागलेल्या पैजेत एका मुलाने चक्क शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. या विद्यार्थ्याला (Student) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये ही घटना घडली. कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला कानपूरच्या किदवई नगरातील एक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका मुलाने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली.
विद्यार्थ्यांमध्ये लागली पैज
शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या काही मुलांमध्ये पैज लागली होती. या विद्यार्थ्यांपैकी कोणाला सुपरमॅन, कोणाला स्पायडरमॅन तर कुणाला बॅटमॅन आवडत होता. आपला सुपरहिरो किती ताकदवान, जास्तवेळ कोणता सुपरहिरो हवेत उडतो यावरुन या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरु होती. ही चर्चा इतकी रंगली की विद्यार्थ्यांनी पैज लावली. यावेळी एका विद्यार्थ्याने आपला सुपरहिरो जास्त ताकदवान असल्याचं सांगत पैज लावली. या विद्यार्थ्याने थेट शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारली. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी पडल्याची गोष्ट कळताच शाळेत एकच खळबळ उडाली.
शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. या विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाला बॉलिवूडचा एका सुपरहिरो खूप आवडत होता, आणि त्याच्यासारखा स्टंट करण्याच्या नादात मुलाने शाळेतून उडी मारली. ही संपूर्ण घटना शाळेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शाळेने दिलेल्या माहितीनुसार मुलांकडून नकळत ही गोष्ट घडली आहे. याप्रकरणी पोलिसातही माहिती देण्यात आली. जखमी विद्यार्थ्यावर कानपूरमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.