Success Story: एखादा उद्योग करायचा असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि ध्येय गाठण्यासाठी वेडेपण तुमच्या अंगी असणे गरजेचे असते. तरच तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता. हे सर्व गुण अंगी असल्याने उद्योग यशस्वी करणाऱ्या उद्योजकाची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहे. अनुभव दुबे असे याचे नाव असून तो 'चाय सुत्ता बार'चा सह-संस्थापक आहे. अनुभवकडे आता 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा ब्रँड आहे. योग्य दृष्टी आणि दृढनिश्चयाने कोणीही एखाद्या कल्पनेला यशस्वी व्यवसायात बदलू शकतो, हे त्याने जगाला दाखवून दिलंय.
अनुभव दुबे हा मध्य प्रदेशातील रेवा येथील रहिवासी असून तो अवघ्या 28 वर्षांचा आहे. अनुभव दुबेकडे आयआयटी किंवा आयआयएमसारख्या उच्च संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा पर्याय होता. तसे त्याने स्वप्नही पाहिले होते. पण त्याने या पारंपारिक मार्गावरुन न जाण्याचा निर्णय घेतला. उद्योग क्षेत्रात येण्याआधी अनुभवने यूपीएससी परीक्षा देखील दिली पण त्यात तो यशस्वी झाला नाही. आपले खरे ध्येय उद्योजकतेत आहे, हे त्याला जाणवले. यानंतर त्याने त्याच्या आवडीचे अनुसरण करण्याचा आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला.
2016 मध्ये अनुभवने आपला मित्र आनंद नायकसोबत भागीदारी केली आणि फक्त 3 लाख रुपयांपासून 'चाय सुत्ता बार' सुरू केला. यासाठी त्याने आपली सेव्हिंग खर्च केली. उद्योग सुरु करण्यासाठी त्याच्याकडे कोणतेही औपचारिक व्यवसाय प्रशिक्षण किंवा अनुभव नव्हता. उद्योजकतेच्या जगात तो पहिल्यांदाच प्रवेश करत होता. मध्य प्रदेशातील इंदूर येथील मुलींच्या वसतिगृहाजवळ त्यांनी एका लहान चहाच्या टपरीपासून आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली. त्यांनी पारंपारिक मातीच्या कपांमध्ये ज्याला कुल्हड असे म्हणतात, त्यातून चहा द्यायला सुरुवात केली. कुल्हड चहा पाहता पाहता स्थानिक लोकांमध्ये लवकरच लोकप्रिय झाला.
अनुभव आणि त्याच्या मित्राकडे मर्यादित निधी होता, म्हणून त्यांनी आपल्या आत दडलेल्या क्रिएटीव्हीटीला वाव दिला. त्यांनी स्वतःच बोर्ड रंगवले आणि त्यांच्या पहिल्या कॅफेच्या आतील भाग डिझाइन केले. पर्यावरणपूरक कुल्हडमध्ये 20 वेगवेगळ्या चवींमध्ये चहा देण्याची अनोखी संकल्पना त्यांनी आणली. ही संकल्पना मोठ्या संख्येने ग्राहकांना आकर्षित करु लागली. आज 'चाय सुत्ता बार' भारतातील 195 हून अधिक शहरांमध्ये तसेच दुबई आणि ओमानमध्ये 165 हून अधिक दुकानांमध्ये विस्तारला आहे.
अनुभवच्या कंपनीने 250 हून अधिक कुंभार कुटुंबांकडून पारंपारिक कुल्हड विकत घेतले. ज्यामुळे त्यांनाही स्थिर उत्पन्न मिळाले आणि त्यांच्या उपजीविकेला मदत झाली. यावर्षी कंपनीची उलाढाल 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. अनुभव आणि त्यांच्या टीमसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. एका छोट्या चहाच्या दुकानापासून ते देशव्यापी ब्रँडपर्यंतचा त्यांचा प्रवास व्यवसायाच्या जगात आवड, क्रिएटीव्हीटी आणि चिकाटी काय साध्य करू शकते? याचे खरे उदाहरण आहे.