Shantanu Deshpande : भारतात गरीब आणि श्रीमंत यांच्यात मोठी दरी पहायला मिळते. तर, सर्वसामान्यांना कमाईपेक्षा जास्त टॅक्स भरावा लागतो. अशातच भारतातील श्रीमंत कुटुंबांच्या वास्तव दर्शवणारी पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. भारतातील 2000 श्रीमंत कुटुंबांकडं आहे देशातील 18 टक्के संपत्ती आहे. मात्र, हे किती TAX भरतात याबाबत बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू देशपांडे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
शंतनू देशपांडे यांनी या पोस्टच्या माध्यमातून भारतातील आर्थिक रचनेतील महत्त्वपूर्ण असमानतेकडे लक्ष वेधले आहे. या पोस्टच्या माध्यमातुन त्यांनी भारतातील श्रीमंत कुटुंबाच्या संपत्तीचा उल्लेख करत ते किती टॅक्स भरतात हे देखील सांगितले आहे. या पोस्टच्या माध्यामातून शंतनू देशपांडे यांनी मांडलेले वास्तव अत्यंत धक्कादायक असे आहे.
भारतात जवळपास 2 हजार श्रीमंत कुटुंब आहेत. देशाची मोठी संपत्ती या कुटुंबांकडेच केंद्रित झालेली आहे. देशाच्या एकूण संपत्तीपैकी 18 टक्के संपत्ती ही भारतातील या 2000 श्रीमंत कुटुंबांकडं असल्याचे शंतनू देशपांडे यांनी सोशल मिडिया पोस्ट म्हंटले आहे. मात्र, याची नेमकी आकडेवारी माहीत नाही असं देखील त्यांनी पुढे या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
देशातील सर्वसमान्य सर्वाधिक कर भरतात. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर सर्वसमान्यांकडून प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे कर आकरला जातो. मात्र, देशातील श्रीमंत कुटुंब किती कर भरतात याची आकडेवारी देखील शंतनू देशपांडे यांनी पोस्टमध्ये लिहीली आहे. भारतातील 2000 श्रीमंत कुटुंबांचा देशातील एकूण करात वाटा फक्त 1.8 टक्के इतका आहे. याला काय म्हणायचं असं म्हणत शंतनू देशपांडे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
‘कठोर परिश्रम करा आणि प्रगती करा,’ असं नरेटिव्ह ही श्रीमंत आणि उद्योजक मंडळी पसरवतात. देशात 99 टक्के लोक नोकरी करतात. आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोक नोकरी करतात. जेव्हा आर्थिक गरजा सहज पूर्ण होतील त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कुणीही नोकरी करणार नाही असं देखील शंतनू देशपांडे यांनी पोस्टमध्ये लिहीले आहे.