शाळेत न जाणाऱ्या 'समृद्धी'ची गोष्ट...

ती शाळेत गेलीच नाही. मात्र, समृद्धीची 'निसर्गातली शाळा'... समृद्धीची ही वेगळी गोष्ट सुरू होते केरी गावात....

Updated: May 30, 2017, 06:23 PM IST
शाळेत न जाणाऱ्या 'समृद्धी'ची गोष्ट... title=

अनिल पाटील, झी मीडिया, पणजी : पाऊस नेमका कुठून पडतो? गोगलगाईच्या पाठीवर शिंपला येतो कुठून? सुतार पक्ष्याच्या चोचीला धार कुणी काढली? रातराणीचा सुगंध रात्री का येतो? सुगरण सुंदर घरटं बांधायला कुठे शिकली? असे बरेचसे प्रश्न समृद्धीला लहानपणापासूनच पडायचे... आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिनं स्वतःच शोधायची ठरवली... आणि सुरू झाली समृद्धीची 'निसर्गातली शाळा'... समृद्धीची ही वेगळी गोष्ट सुरू होते केरी गावात....

पश्चिम घाटात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत वसलेलं हे केरी गाव... या गावाला निसर्गसंपन्नतेचा वारसा... याच गावात समृद्धीचे आई वडील राजेंद्र आणि पौर्णिमा केरकर राहतात. दोघांचाही ध्यास एकच... पर्यावरणाचं रक्षण... पश्चिम घाट वाचला पाहिजे... पुढच्या पिढीला हे निसर्गाचं समृद्ध लेणं अनुभवता आलं पाहिजे... त्यासाठी त्यांनी 'स्वामी विवेकानंद निसर्ग संवर्धन फौज'ही तयार केलीय. समृद्धी ही या जोडप्याची मुलगी... समृद्धी आता सोळा वर्षांची झालीय. शिक्षकांची मुलगी असूनही ती आत्तापर्यंत कधीच शाळेत गेली नाही... ती शिकली निसर्गाच्याच शाळेत... 

शाळेत गेली नाही म्हणून तिला कसली खंत नाही की तक्रार नाही... आई-वडिलांनी लिहायला वाचायला शिकवल्यावर तिनं भरपूर पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी भाषांमधली हजारो पुस्तकं तिनं वाचलीत. त्यातही जास्त निसर्गाबद्दलच वाचायला आवडतं... भोवतालचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यांच्याबद्दल ती जे पाहते, अनुभवते ते साध्या सरळ सोप्या भाषेत लिहून काढते... शाळेत न जाणाऱ्या समृद्धीची आतापर्यंत चार पुस्तकं प्रकाशित झालीत. 'अप्रुप वसुंधरेचे' हा ललित लेखनाचा अनुभवपट, 'निर्झर' हा कविता संग्रह, 'चित्रांची गोष्ट' हे निसर्गाच्या समृद्धीची आठवण करून देणारं पुस्तक आणि एक पुस्तक तिनं काढलेल्या चित्रांचं...

स्वतः शिक्षक असूनही आपली मुलगी कधी शाळेत गेली नाही, याची समृद्धीच्या आई वडिलांना मुळीच खंत नाही. या दोघांचीही शिक्षण व्यवस्थेबद्दल काही मतं आहेत... भिंतींच्या शाळेत शिरून पदव्या घेण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मुलीसाठी निसर्गातली ही उनाड शाळाच जास्त आवडते.   

समृद्धी जंगलात एकटीच फुलपाखरासारखी भटकते... अगदी रात्रीसुद्धा रानावनातून एकटी फिरते. कधी या निसर्गाच्या छटा कॅमेऱ्यात टिपते.... तिच्या आई वडिलांबरोबर फिरुन पर्यावरणाबद्दल माहिती घेते.

समृद्धीची ही शाळा खूप वेगळी आहे... या शाळेत तिला पदव्या मिळणार नाहीत, पण निसर्गाच्या सोबत राहून जी ऊर्जा, जो अनुभव मिळतो त्याला तोड नाही... गलेलठ्ठ पगाराची नोकरी, हे काही तिचं ध्येय नाही... तर ज्या निसर्गात वाढलो, त्या निसर्गाचं रक्षण करुन त्याचं जतन करण्याचं महत्त्वाचं काम तिला करायचंय... म्हणूनच बिनभिंतीची ही समृद्धीची एक उनाड शाळा खऱ्या अर्थानं समृद्ध करणारी आहे.