RBI Imposed Panelty For HDFC and Axis Bank : नियमांची पायमल्ली आणि चुकीच्या पद्धतीनं होणारे आर्थिक व्यवहार या कारणांमुळं भारतीय रिझर्व्ह बँकेनं पुन्हा एकदा देशातील दोन मोठ्या बँकांना मोठी शिक्षा दिली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरबीआयनं शिक्षा सुनावलेल्या या बँकांच्या यादीत खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी आणि अॅक्सिस या दोन बँकांचा समावेश आहे.
HDFC Bank Axis Bank या दोन्ही बँकांनी आरबीआकडून आखून देण्यात आलेल्या नियमांचं पालन केलं नसल्या कारणानं ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही बँकांच्या खातेधारकांना सदर कारवाईसंदर्भातील माहिती असावी या कारणानं बँकांनी अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून या कारवाईसंदर्भातील माहिती दिली आहे.
देशातील सर्व आर्थिक संस्था आणि बँकांच्या कारभारांवर रिझर्व्ह बँक करडी नजर ठेवून असते. पण, नियम झुगारून कार्यवाही करणाऱ्या बँकांना मात्र आरबीआयकडून सूट दिली जात नाही. असंच काहीसं अनेकांच्या पगाराची खाती असणाऱ्या एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेसोबत घडलं आहे. सध्या या दोन्ही बँकांना मिळून 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेच्या वतीनं ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या केव्हायसी, डिपॉझिट व्याजदर या आणि अशा इतर सेवांमध्ये सुविधांमध्ये बेजबाबदारपणा आढळल्यामुळं की कारवाई करण्यात आली.
एचडीएफसी बँकेला आरबीआयकडून 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. ठेवींवरील व्याजदर, रिकवरी एजंट आणि बँक कस्टमर सर्विससाठीच्या निर्देशांचं पालन न करणं या कारणांनी बँकेवर कारवाई झाली आहे. तर, अॅक्सिस बँकेला 1.91 कोटी रुपयांचा दंड आरबीआयनं ठोठावला आहे. इथं बँकिंग रेग्लुलेशन अॅक्टमधील नियमांचं उल्लंघन केल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे.
दोन्ही बँकांना कोट्यवधींचा दंड ठोठावण्यात आला असला तरीही सामान्य खातेधारकांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं बँकांनी पत्रक जारी करत स्पष्ट केलं आहे. त्यामुळं दैनंदिन बँक व्यवहार प्रभावित होणार नाही असंही बँकांनी स्पष्ट केलं आहे.