लखनऊ: प्रभू रामचंद्र आज असते तर त्यांनाही बलात्काराच्या घटना थांबवणे अशक्य होते, असे वादग्रस्त विधान भाजपा आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी केले. ते शनिवारी एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांविषयी विचारण्यात आले. तेव्हा सुरेंद्र सिंह यांनी अजब युक्तिवाद केला. त्यांनी म्हटले की, आजच्या काळात प्रभू रामचंद्र असते तरी बलात्कारासारख्या घटना थांबल्या नसत्या हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. कारण, हे प्रकारचे नैसर्गिक प्रदूषण आहे. त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. त्यामुळे इतरांच्या कुटुंबीयांना, बहिणींना आपल्या बहिणीसारखी वागणूक देणे, हे लोकांचे कर्तव्य आहे. या समस्येवर कायद्याच्या नव्हे तर मूल्यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येऊ शकते, असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले.
सुरेंद्र सिंह यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीप सिंग सेनगार यांचे जाहीरपणे समर्थन केले होते. याशिवाय, त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची तुलना देहविक्रय करणाऱ्या महिलांशी केली होती. सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्रय करणाऱ्या महिला परवडल्या. निदान त्या पैसे घेऊन आपले काम तरी नीट करतात. मात्र, सरकारी कर्मचारी पैसे घेऊनही तुमचे काम व्यवस्थित करतील, याची कोणतीही शाश्वती नसते, अशी मुक्ताफळे सुरेंद्र सिंह यांनी उधळली होती.