नवी दिल्ली : रेल्वेची नोकरी मिळवण्याचा अधिकार सर्वांचा आहे. प्रशिक्षणार्थींनीही इतरांसोबत नोकरीसाठी प्रयत्न करावेत, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.
रेल्वेत वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार असून ३१ मार्च २०१८ पर्यंत अर्ज करण्याची मुदत असल्याची आठवण त्यांनी प्रशिक्षणार्थींना करून दिलाय. प्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबतच्या आरक्षणावर काहीच भाष्य न करता त्यांनी खुल्या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला प्रशिक्षणार्थींना दिलाय.
आज सकाळी सुरू झालेलं रेल्वे रोको आंदोलन अखेर साडे तीन तासांनंतर मागे घेण्यात आलं. सकाळी सात वाजल्यापासून मध्ये रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर रेल्वेतल्या प्रशिक्षणार्थींनी आंदोलन केलं. देशभरातल्या शेकडो विद्यार्थ्यांनी सकाळी सात वाजताच रुळांवर उतरत लोकल रोखून धरल्या. कायम नोकरीत घ्यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. नोकरदारांचा प्रचंड खोळंबा झाला. सकाळी कामावर निघालेल्या लाखो मुंबईकरांची पुरती वाट लागली. या आंदोलनाला साडे आठ नऊच्या सुमाराला हिंसक वळण मिळालं. पोलिसांनी प्रशिक्षणार्थींवर लाठीमार केला. प्रत्युत्तरादाखल प्रशिक्षणार्थींनीही दगडफेक केली. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं. अखेर रेल्वेच्या अधिका-यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी चर्चा केली. प्रशिक्षणार्थींच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन देऊ, असं अधिकाऱ्यांनी सांगितल्य़ावर अखेर आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतलं आणि पावणे अकराच्या सुमाराला माटुंग्यातून लोकल सुटल्या.
1. सकाळी सात वाजता मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर रेल्वे रोको.... रेल्वेच्या प्रशिक्षणार्थींनी विविध मागण्यांसाठी आंदोलकांचं रुळांवर ठिय़्या आंदोलन
2. सकाळी सकाळी मुंबईकर वेठीला, शेकडो आंदोलक रुळांवर उतरल्यानं मुंबईकरांचे हाल
3. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस रुळांवर उतरले..... आंदोलकांना पांगवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
4. आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार
5. पोलिसांच्या लाठीमाराला उत्तर देण्यासाठी प्रशिक्षणार्थींची दगडफेक
6. मुंबईकरांना अखेर लोकलमधून उतरुन रुळांवरुन चालत जावं लागलं
7. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर सह मध्य रेल्वेच्या सगळ्याच स्थानकांवर प्रचंड गर्दी
8. माटुंग्यातल्या रेल्वेरोकोचा रस्ते वाहतुकीवर परिणाम, एलबीएस रोडवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगाच रांगा
9. अखेर साडे तीन तासांनी आंदोलन मागे, ठाण्यातून पावणेअकराच्या सुमाराला पहिली लोकल सुटली
10. रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर आंदोलक रुळांवरुन हटले, माटुंग्यातून पहिली लोकल सुटली