चंदीगढ : पंजाबमध्ये पंचायत समिति आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवित आघाडीवर आहे. अकाली दल-बीजेपी युतीला जोरदार झटका बसला आहे. आम आदमी पार्टी पराभवाच्या छायेत आहे. एकूण 354 जिल्हा परिषद सदस्य आणि 2900 पंचायत समिती सदस्य निवडून द्यावयाचे आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या 33 उमेदवार आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत 369 उमेदवारांना आधीच बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, पंचायत समितीच्या 2900 जागांपैकी काँग्रेस 862 जागांवर विजय मिळवलाय. तर अकाली दल 108 आणि आम आदमी पार्टीने केवळ 7 जागा जिंकल्या आहेत. निवडणूक 19 सप्टेंबर रोजी झाली.
निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या बाबतीत काँग्रेसने 25 पैकी 18 जागा जिंकल्या आहेत आणि बाकी ठिकाणी आघाडी घेतली आहे. जवळजवळ 10 वर्षांनंतर शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला या निवडणुकीत जोरदार झटका बसला आहे. तर आपची हार झालेली पाहायला मिळत आहे.
गुरदासपुरमध्ये घोषित निकालांमध्ये काँग्रेसने पंचायत समितीच्या 213 पैकी 212 जागा जिंकल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी हा विकासाला कौल असल्याची प्रतिक्रिया दिलेय. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले की, 'विरोधी पक्षाने आमच्याविरोधात चुकीचा प्रचार केला. मात्र, सरकारने राबविलेल्या विकासकामांना जनतेने कौल दिलाय.'