बंगळुरू : 'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याला अटक करण्यात आलीय. बंगळुरूमध्ये दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं बातमी प्रसिद्ध करण्याचा आरोप हेगडेवर करण्यात आलाय.
११ मार्च रोजी 'पोस्टकार्ड न्यूज' वेबसाईटवर एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीत एक जैन मुनी श्री. उपाध्याय मयंक सागरजी महाराज यांच्यावर एका मुस्लिम व्यक्तीनं हल्ला केल्याचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात मात्र जैन मुनी एका रस्ते अपघातात किरकोळ जखमी झाले होते. एका बाईकनं त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली होती.
महेश विक्रम हेगडे यांनी जखमी जैन मुनीचा फोटो पोस्ट करत लिहिलं होतं 'सिद्धरामय्या सरकारमध्ये कुणीही सुरक्षित नाही'. हा जखमी जैन मुनीचा फोटो हजारो लोकांनी शेअर केला होता.
'फेक न्यूज' प्रसिद्ध केल्याप्रकरणी महेश हेगडेवर पोलिसांनी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. हेगडे यांच्यावर आयपीसी कलम १५३-ए (दंगा भडकावण्याचा प्रयत्न), कलम ३४, कलम १२० (बी) आणि आयटी अॅक्ट कलम ६६ (फसवणूक) असे गुन्हे दाखल करण्यात आलेत. सध्या कोर्टानं हेगडे यांना न्यायालयीन कोठडीत धाडलीय.
उल्लेखनीय म्हणजे, हेगडे याच्यावर पहिल्यांदाच 'फेक न्यूज'चा आरोप झालेला नाही. यापूर्वीही त्यांच्यावर असे अनेक आरोप करण्यात आलेत. सोशल मीडियावर ट्विटरवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेगडे यांना फॉलो करतात.