नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलही लवकरच गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्सच्या (GST)कक्षेत येण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनीच हे संकेत दिले आहेत. GSTच्या कक्षेत आल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्यास मदत होऊ शकते.
राज्यसभेमध्ये बोलताना अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले की, सरकार पेट्रोल आणि डिझेल उत्पादनांना GSTच्या कक्षेत आनण्याससंदर्भात विचार करत आहे. जेटली म्हणाले, केंद्र सरकार या मुद्दयावर सर्व राज्यांच्या मान्यतेची वाट पाहात आहे. केंद्र सरकारला विश्वास आहे की, राज्य सरकारेही यावर सहमत होतील. राज्य सरकारांची मान्यता आली की, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली बोलत होते.
चिदंबरम यांनी प्रश्न विचारला होता की, भारतीय जनता पाक्ष आता 19 राज्यांमध्ये सरकार बनवत आहे. शिवाय या पक्षाचे केंद्रातही सरकार आहे. असे असताना पेट्रोलियम पदार्थांना GDTच्या कक्षेत आणण्यापासून सरकारला कोण रोखत आहे. GST काऊन्सील बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांना GSTच्या कक्षेत आणण्याचा निर्णय कधी घेतला जाईल. पेट्रोल आणि डिझेलवर जास्तीत जास्त 28 टक्के टॅक्स अपेक्षीत आहे. ज्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती अधिक स्वस्त होतील.