नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र संघाच्या ७३ व्या आमसभेत रविवारी पाकिस्तानकडून RSS आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यात आली. सुषमा स्वराज यांनी शनिवारी आपल्या भाषणात पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून फटकारले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे राजदूत साद वराईच यांनी आज 'राईट टू रिप्लाय' अंतर्गत भारताला दहशतवाद्यांच्या मुद्दांवरून प्रत्युत्तर दिले.
साद वराईच यांनी म्हटले की, RSS भारतामध्ये दहशतवाद आणि हुकुमशाही पेरत आहे. ज्या देशामध्ये मशिदी आणि चर्च जाळली जातात त्यांना दुसऱ्यांना बोलण्याचा कोणताही आधिकार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एक कट्टर हिंदूत्ववादी आहेत. ते उघडपणे केवळ हिंदुत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. भारतात अल्पसंख्याक समाजातील मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांना मॉब लिंचिंगसारख्या घटनांना सामोरे जावे लागते, असे वराईच यांनी सांगितले.