नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या परवानगीनंतर दारुगोळा निर्मिती मंडळ अर्थात Ordnance Factory Board यांच्याकडून 'धनुष' या स्वदेशी तोफांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठीची वाट आता मोकळी झाली आहे. संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता एकूण ११४ 'धनुष' तोफा भारतीय सैन्यदलात दाखल होणार आहेत. एकिकडे भारतावर शत्रू राष्ट्राकडून होणारे भ्याड हल्ले पाहिले असता, आता 'धनुष' अशाच शत्रूचा अचूक नेम साधत त्यांचा नायनाट करणार हेच स्पष्ट होत आहे. ही आहेत धनुषची काही खास वैशिष्ट्ये....
-१५५ मीमी x ४५ कॅलिबर या लांब पल्ल्याच्या 'धनुष' नामक तोफांचा भारतीय सैन्यात आता समावेश होणार आहे. दारुगोळा निर्मिती मंडळ आणि भारतीय सैन्यदल यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या तोफेची निर्मिती झाल्याचं कळत आहे.
- भाजप सरकारच्या 'मेक इन इंडिया' या योजनेअंतर्गत निर्मिती होणारी, सर्वाधिक लांब अंतरावर असणाऱ्या शत्रूवरही मारा करु शकणारी ही पहिलीच तोफ आहे.
- 'देशी बोफोर्स' म्हणूनही 'धनुष'चा उल्लेख केला जातो.
-३६० अंशांमध्ये फिरत ३८ किलोमीटर आणि त्याहून जास्तीच्या अंतरापर्यंत मारा करत शत्रूची धुळधाण करण्याची क्षमता या तोफेमध्ये आहे. अवघ्या काही सेकंदांमध्ये ही तोफ तिची दिशा बदलू शकते.
-प्रकाशात आणि अंधारातही ही तोफ तितक्याच भेदकपणे मारा करु शकते.
-मुळच्या परदेशी बोफोर्सपेक्षा या तोफेची मारक क्षमता ११ किलोमीटरहून जास्त आहे. साठ राऊंडमध्ये ही तोफ एकूण ६० वेळा मारा करु शकते. जगातील सर्वाधिक लांबच्या अंतराचा मारा करु शकणाऱ्या तोफांपैरी ही एक तोफ आहे.
-एकदा या तोफेत दारुगोळा भरला की शत्रूला सुगावाही लागणार नाही इतक्या शांततेत तिच्या माध्यमातून मारा करता येतो.
-सिक्कीमच्या डोंगराळ भागापासून ते राजस्थानच्या वाळवंटापर्यंत या तोफेची चाचणी घेण्यात आली आहे. सिक्कीम, लेह, ओडिशा, झाँसी, पोखरण अशा अतिथंड, दमट आणि उष्ण वातावरणांमध्येही 'धनुष' तरबेजपणे कार्यरत राहणार आहे. डोंगररांगांमध्येही 'धनुष'ला सहजपणे नेता येणं शक्य आहे.
-'डीआरडीओ', 'डीजीक्यूए', 'पीएयू'चे 'बेल' आणि 'सेल' (DRDO, DGQA, Defence PSUs such as BEL and PSUs including SAIL) यांनी या तोफेच्या निर्मितीत हातभार लावला आहे.