Salary News : नोकरी, (Job News) पगारवाढ (Salary Hike), सुट्ट्या, कार्यालयीन वेळा याचसंदर्भातील चर्चा आपण नोकरदार वर्गाच्या वर्तुळात सातत्यानं पाहतो. कामाचे तास, मिळणारं वेतन, त्यातच संस्थेकडून मिळणाऱ्या इतर सोयीसुविधा या बाबतीत कर्मचारी कमीजास्त प्रमाणात नाराजीचा सूर आळवतच असतात. त्यातही पगारवाढीच्या दिवसांमध्ये जर मनाजोरी पगारवाढ मिळाली नाही, तर हीच मंडळी थेट नोकरी सोडून एखाद्या दुसऱ्या संस्थेत चांगल्या संधीच्या शोधार्थ नव्या नोकरीसाठी प्रयत्न करू लागतात. तुम्हीही असं केलं असेल किंवा असं करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी वाचा.
मागील वर्षभरामध्ये अनेक नामांकित संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला, काहींनी पगारात कपात केली, तर कुठे वार्षिक पगारवाढच झाली नाही. आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत फारशी पगारवाढ झाली नाही. बरं, पगारवाढ नाही म्हणून नोकरी बदलण्याचा निर्णय घेणाऱ्या अनेकांनाही त्यांच्या या निर्णयाचा फटका बसला.
जागतिक आर्थिक मंदीचा फटका सध्या अनेक क्षेत्रांना बसत असून, स्टाफिंग संस्था शिफेनकडून यासंदर्भातील एक आकडेवारी समोर आली. या आकडेवारीनुसार उत्पादन, सेवा, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांना मंदिचा फटका बसल्याचं स्पष्ट झालं. परिणामी नोकरी बदलून जास्त पगाराची अपेक्षा ठेवणाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला, कारण अनेकांनाच अपेक्षित पगारवाढ मिळाली नाही. मागील वर्षभरामध्ये फ्रंट एंड आणि बॅकएंड इंजिनिअर्सची त्यांच्या क्षेत्रातील बार्गेनिंग पॉवर मोठ्या फरकानं घटली असून, त्यांचे त्यांना याआधी 50 ते 100 टक्के पगारवाढ मिळत होती. आता मात्र हा आकडा 35 ते 40 टक्क्यांवर आला आहे.
सर्व्हेक्षणानुसार दरम्याच्या काळात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या. त्याच धर्तीवर त्यांना एकाच वेळी एकाहून अधिक संस्थांचे नोकरीसाठीचे प्रस्ताव आले. यातून सर्वोत्तम पगाराच्या प्रस्तावाचा स्वीकार करत होते. यंदाच्या वर्षी मात्र याउलट चित्र असून, कंपन्यांकडे कर्मचाऱ्यांचे एकाहून अधिक पर्याय असल्यामुळं कमीत कमी वेतनात मिळणाऱ्या आणि चांगलं काम करणाऱ्यांनाच प्राधान्य मिळताना दिसत आहे.
तुम्हीही येत्या काळात एका ठिकाणी कमी पगार आहे म्हणून कोणा दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करताय किंवा नव्या प्रस्तावाचा विचार करताय? तर, सर्वप्रथम वस्तुस्थिती आणि तुमच्या हातात येणारी पगाराची रक्कम पाहा. कारण, पगारवाढ होण्यापेक्षा पगाराची समाधानकारक रक्कम हातात येणंही तितकंच महत्त्वाचं.