पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारमध्ये गेले आहेत. येथील दरभंगा परिसरात बुधवारी मोदींची प्रचारसभा झाली. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप आणि जनता दलाच्या (संयुक्त) प्रचारसभेत हा प्रसंग घडला. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी वंदे मातरमची घोषणा द्यायला सुरुवात केली. तसेच त्यांनी 'मै भी चौकीदार' ही घोषणाही लोकांकडून वदवून घेतली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणारे इतर नेतेही मोदींपाठोपाठ जोरजोरात घोषणा देत होते. मात्र, केवळ नितीश कुमारच यावेळी व्यासपीठावर शांतपणे बसून होते. ते खुर्चीवर शांतपणे बसून मंदपणे स्मित करत होते. अखेरपर्यंत ते मोदींच्या या घोषणाबाजीत सहभागी झाले नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेचा सुरुवात झाली आहे.
यापूर्वी २०१४ मध्ये नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला जोरदार विरोध केला होता. याच मुद्द्यावरून ते 'एनडीए'तून बाहेरही पडले होते. यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या साथीने नितीश कुमार यांनी भाजपचा विजयी अश्वमेध रोखला होता. मात्र, २०१६ मध्ये नितीश यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी बिहारमध्ये भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली होती. परंतु, यानंतर राष्ट्रीय राजकारणात मोदींपुढे नितीश यांची प्रतिमा काहीशी झाकोळली गेली होती.
त्यामुळे दरभंगाच्या सभेतील नितीश कुमार यांच्या कृतीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. काहीजणांच्या मतानुसार, नितीश कुमार आपली राजकीय स्पेस वाचवत आहेत. नितीश यांनी आपल्या व्होटबँकेचा विचार करूनच मोदी यांच्या घोषणाबाजीला प्रतिसाद देणे टाळले. जेणेकरून भविष्यात सर्व राजकीय पर्याय खुले राहतील, हा नितीश यांचा प्रयत्न आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग प्रचंड यशस्वी ठरला होता. यामध्ये त्यांना हिंदू आणि मुसलमान समुदायाशिवाय भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला विरोध असणाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला होता.