Job News : आठ तास नोकरी, दोन दिवसांची आठवडी सुट्टी आणि भरमसाट काम हे असंच काहीसं चक्र सध्याची तरुण पिढी त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अर्थात त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अनुभवताना दिसते. कागदोपत्री असणारे हे आठ तास कधी 10 आणि 12 तासांवर पोहोचतात हेच अनेकांच्या लक्षातही येत नाही. पण, सध्याचा काळच तसा आहे, 'करो या मरो'चा. म्हणजेच एकतर सर्वस्व पणाला लावून काम करा किंवा मग कंपनी तुम्हाला नारळ देण्यासाठी सज्ज आहेच.
मागील काही वर्षांमध्ये नोकरदार क्षेत्रात ही परिस्थिती इतकी रुजली आहे, की आता नोकरीचे तास, सुट्ट्या ही समीकरणंच काहीशी मागे पडताना दिसत आहेत. नोकरीचं स्वरुप, काम करण्याचे तास या साऱ्या चर्चांमध्ये आता नव्यानं भर पडली आहे ती म्हणजे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेले उद्योजक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या एका लक्षवेधी वक्तव्यानं.
जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर, सध्याच्या युवा वर्गानं आठवड्यातून 70 तास काम करण्यासाठी तयार रहावं, असं ते म्हणाले. 3one4 च्या एका पॉडकास्ट कार्यक्रमात ते बोलत होते. देशनिर्मिती आणि तंत्रज्ञानासंबंधीसुद्धा त्यांनी चर्चा केली. जपान आणि जर्मनीसारख्या देशांविषयी बोलताना त्यांनी कामाच्या वाढीव तासांसंदर्भातील मुद्दा अधोरेखित केला.
जागतिक उद्योग निर्मितीमध्ये भारत अतिशय पिछाडीवर आहे असं म्हणताना त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. देशातील भ्रष्टाचारावरही त्यांनी कटाक्ष टाकत आपल्या देशात नोकरशाहीसंदर्भात निर्णय घेण्यात उशीर होत असल्यामुळं आपण बहुतांश देशांशी स्पर्धा करण्यास अपयशी ठरतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.
चीनसारख्या देशांशी स्पर्धा करायची असल्यास भारतीय तरुण पिढीला कामाचं प्रमाण वाढवण्यासोबतच इतरही अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे असंही त्यांनी सांगितलं. दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देत जपान आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये परिस्थिती बदलली असं सांगताना भारतातील तरुणाईनं पुढे येत आपण आठवड्यातून 70 तास काम करण्यासाठी तयार असल्याचं सांगावं आणि देशाला पुढे नेण्यात हातभार लावावा असं सूचक वक्तव्य केलं.
भारतात कामाच्या पद्धतीत सुधारणा करणं आणि समर्पकतेनं काम करणं या साऱ्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. इथं नारायण मूर्ती यांनी आपले विचार मांडताना वारंवार 70 तासांचा उल्लेख केला आणि तिथं सोशल मीडियावर त्यावर संमिश्र प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काहींनी या बाबतीत नाराजी व्यक्त केली, तर काहींनी आपण आताच 70 हून अधिक तास काम करत असल्याचं म्हणत नोकरीच्या ठिकाणी बिघडलेली परिस्थिती प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. मागील काही वर्षांमध्ये देशातील नोकरदार वर्गामध्ये आणि या क्षेत्रामध्ये झालेले बदल पाहता ही परिस्थिती नेमकी किती बिकट आहे हेसुद्धा अनेकांनीच अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नारायण मूर्ती यांचं म्हणणं पटतंय का? कमेंटमध्ये कळवा.