मुंबई : Umngot River नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की त्यात चालणारी बोट हवेत तरंगत असल्याचे दिसते. या नदीचे चित्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. चित्रांमध्ये तुम्हाला नदीच्या पात्रात सापडलेले दगड स्पष्टपणे दिसत आहेत. या नदीच्या आतील प्रत्येक वस्तू स्पष्टपणे दिसते. नदी इतकी पारदर्शक आहे की त्यात तुम्हाला तुमचा स्वतःचा चेहराही दिसतो.
भारताच्या जलशक्ती मंत्रालयाने नदीचा फोटो ट्विट करून लिहिले, 'जगातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक, उमंगोट नदी भारतात आहे. जणू बोट हवेतच तरंगत आहे. पाणी खूप स्वच्छ आणि पारदर्शक असून आपल्या सर्व नद्या अशाच स्वच्छ असव्या. मेघालयच्या जनतेला सलाम.
उमंगोट नदी आशियातील सर्वात स्वच्छ गावाचा दर्जा असलेल्या मावलिनॉन्ग गावातून जाते. हे गाव भारत-बांगलादेश सीमेजवळ आहे. ही नदी बांगलादेशच्या आधी जैंतिया आणि खासी हिल्सच्या मध्ये जाते.
नदीचे नाव उमंगोट नदी असले तरी मेघालयात ती डवकी नदी म्हणून प्रसिद्ध आहे. ही नदी शिलाँगपासून 100 किमी दूर वाहते. नदीजवळील दृश्येही अप्रतिम आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट इथे सतत ऐकू येतो. याशिवाय नदीत पडणारी सूर्यकिरणे मन प्रफुल्लीत करतात.
या नदीजवळ फिरण्यासाठी वातावरण खूप चांगले आहे. इथे आल्यावर डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून कानाला आराम मिळतो. इथे जायचे असेल तर नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत यावे. यावेळी येथील हवामान प्रवासासाठी उत्तम असते.