Karnataka Election 2023 : प्रताप नाईक / बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टिळक चौकात काळे झेंडे दाखवले. कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बेळगाव उत्तरचे उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेला फडणवीस उपस्थित फडणवीस होते. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. दरम्यान, काळे झेंडे दाखविणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 10 कार्यकर्त्यांना बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बेळगाव येथील प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदी आल्यानंतर भ्रष्टाचार थांबला. टॅक्सची चोरी थांबवली. काळा पैसा तिजोरीत आला. मूठभर लोकांनी त्याच्या तिजोरीत ठेवलेला पैसा मोदी यांनी परत आणला. देशाला एकसंघ करण्याचे काम मोदी करत आहेत. प्रगतीमध्ये डबल इंजिन महत्त्वाचे आहे. मागच्या निवडणुकीत 105 आले होते. भाजपला थोडे कमी पडले होते. मग त्यानंतर कर्नाटकमध्ये सर्कस पाहायला मिळाली.
महाराष्ट्र एकीकरण समितीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टिळक चौकात दाखवले काळे झेंडे । कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला आल्याने समिती आक्रमक । बेळगाव उत्तरचे उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेला फडणवीस उपस्थित pic.twitter.com/vX1Ci0nW6y
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 4, 2023
बजरंगदलावर बंदी टाकायची तुमच्या बापाची हिम्मत नाही. बजरंगबलाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. बजरंगदलावर आम्ही बंदी घालू असं कोणी म्हणत असेल तर त्याच्या मताला आग लावण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मागे आपण राहणार आहोत का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंगदलावर बंदी घालण्याचे जाहीर केले आहे. यावरुन आता भाजप आक्रमक झाली असून बजरंगदलाच्या समर्थनावर भाष्य करताना दिसून येत आहे.